आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran Khan's Party Admits Presence Of Kashmiri Jihadi Forces

काश्मिरी जिहादींचा पाकमध्ये उपद्रव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - काश्मिरी दहशतवादी पाकिस्तानात असल्याची कबुली इम्रान खान यांनी दिली आहे. काश्मिरी दहशतवाद्यांमुळे देशात दहशतवाद वाढला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इम्रानच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या वेबसाइटवर ‘नया पाकिस्तान प्लॅन’ प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये अंतर्गत सुरक्षेच्या सहा घटकांवर चर्चा करण्यात आली आहे. या घटकांमध्ये अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी मोहीम, पाकिस्तानी तालिबानींचा शरीयतसाठी असणारा प्रयत्न, काश्मिरी दहशतवाद्यांचा सक्रिय सहभाग, शिया-सुन्नी गटातील हिंसाचार, धार्मिक दहशतवाद आदींचा समावेश आहे. प्रतिबंधित हिज्बुल मुजाहिदीन आणि अल बद्र मुजाहिदीन संघटनांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये तळ आहेत, हे वास्तव स्वीकारण्यास अनेक संघटना तयार नाहीत. अनेक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात तथाकथित काश्मिरी जनतेच्या चळवळीला पाठिंबा असल्याचे जाहीर करतात. काश्मिरींना केवळ राजकीय, नैतिक पाठिंबा राहील हे सांगण्यासही ते विसरत नाहीत. पाकिस्तानमध्ये काश्मिरी दहशतवादी सक्रिय असल्याची कबुली तेहरिक-ए-इन्साफ या एकमेव पक्षाने दिली आहे.

चार वृत्तपत्रांविरोधात गुन्हे - दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत पाकिस्तानातील चार वृत्तपत्रांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आघाडीच्या जंग वृत्तपत्राचा समावेश आहे. प्रतिबंधित अतिरेकी संघटनांच्या प्रवक्त्यांची वक्तव्ये छापल्याबद्दल संबंधितांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. क्वेटातील जंग, मशरिक, इंतिखाब आणि सेंच्युरी एक्स्प्रेस वृत्तपत्राविरुद्ध शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. संबंधित वृत्तपत्राचे प्रकाशक, मुद्रक, संपादक, वार्ताहरांची नावे एफआयआरमध्ये आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही संबंधित वृत्तपत्रांनी अतिरेक्यांची वक्तव्ये प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानच्या पत्रकार संघाने या कारवाईचा निषेध केला आहे.

बोगस मतदान रोखण्यासाठी मतपत्रिकेवर 11 सुरक्षात्मक बाबी : पाकिस्तान लष्कर सार्वत्रिक निवडणुकीतील मतपत्रिकेच्या छपाई कामात निगराणी ठेवणार आहे. बोगस मतदान टाळण्यासाठी मतपत्रिकेमध्ये 11 सुरक्षात्मक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मतपत्रिकेच्या छपाईसाठी इस्लामाबाद, कराची आणि लाहोर येथील प्रिंटिंग युनिटमध्ये जवान तैनात करण्यात येतील, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजधानीतील प्रिंटिंग प्रेस परिसरात जवान तैनात झाल्याचे दिसून आले. निवडणूक आयोग 18 कोटी मतपत्रिका छापणार आहे. संसद निवडणुकीची मतपत्रिका हिरवी, तर राज्य विधानसभा निवडणुकीची मतपत्रिका पांढरी असणार आहे.