आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Ask America To Withdraw Charges Against Khobragade

खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेण्याची भारताची अमेरिकेकडे मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावरील आरोप मागे घेण्यात यावेत, अशी मागणी भारताचे नवीन राजदूत एस. जयशंकर यांनी शुक्रवारी केली.जयशंकर यांनी भारताच्या तीव्र भावना अमेरिकेपर्यंत पोहोचवल्या आहेत. खोब्रागडे यांना जी वागणूक मिळाली आहे. त्यावर भारताकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
अमेरिकेकडून राजकीय व्यवहार विभागाचे सचिव वेंडी शेर्मन आणि व्यवस्थापन विभागाचे सचिव पॅट्रिक एफ केनेडी यांनी बैठकीत सहभाग घेतला होता. 39 वर्षीय खोब्रागडे यांना याच महिन्यात न्यूयॉर्कमध्ये अटक झाली होती. त्यांच्याकडे त्या वेळी उपउच्चायुक्त पद होते. त्यांच्यावरील कारवाईनंतर भारताने त्यांची तत्काळ संयुक्त राष्ट्राचे विशेष राजदूत म्हणून बदली केली होती. त्यानंतर अटकेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप गाजला.
बैठकीमुळे अमेरिका निश्चितपणे सकारात्मक पाऊल उचलेल, अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली, परंतु बैठकीचा इतर तपशील मात्र समजू शकला नाही. 1999 च्या आयएफएस बॅचच्या अधिकारी असलेल्या खोब्रागडे यांनी मोलकरणीबद्दलची चुकीची माहिती दिली होती, असा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांना अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर सुटका झाली होती. दोन्ही देशांमध्ये खोब्रागडे प्रकरणी तणाव निर्माण झाला आहे. तो निवळावा यासाठी प्रयत्न सुरू असतानाच जयशंकर यांनी घेतलेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. जयशंकर याअगोदर चीनमध्ये राजदूत होते.
विचार सुरू
खोब्रागडे या संयुक्त राष्ट्रातील भारतीय चमूतील महत्त्वाच्या सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय सल्लागार म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांचा कालावधी 31 डिसेंबर 2013 पर्यंत आहे, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. तूर्त तरी आम्ही या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, असे अमेरिकी सूत्रांनी स्पष्ट केले.