आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India China News In Marathi, Chinese Encroachment On Indian Land, Divya Marathi

भारतीय हद्दीत चीनची घुसखोरी, 25 किमी आतपर्यंत घुसले चिनी सैनिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेह/ नवी दिल्ली - भारतीय सीमेलगत चीनने चालवलेल्या कुरापती आणखी वाढल्या आहेत. लडाख क्षेत्रात चिनी सैनिकांनी 17 हजार फूट उंचीवरील बुर्त्से भागात सुमारे 25 किमी आत घुसखोरी केली. गेल्या वर्षी याच भागात हे चिनी जवान घुसले होते. या जवानांनी पाच तंबू ठोकून तळ उभारला होता. तेव्हा 21 दिवस दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भारतीय लष्कराचे एक पथक बुर्त्से भागात न्यू पेट्रोल चौकीकडे जात असताना दीड किमी अंतरावर त्यांना चिनी जवान दिसले. ज्या भागात हे जवान होते तो प्रत्यक्ष ताबा रेषेच्या सुमारे 25-30 किमी आत होता. त्या वेळी भारतीय जवान परतले. मात्र, सोमवारी पुन्हा या चौकीवर जात असताना त्यांना चिनी जवान मोठ्या संख्येने तेथे एकत्र आले असल्याचे लक्षात आले. ‘हा भूभाग चीनचा आहे. परत फिरा...’ अशा आशयाचा मजकूर त्यांच्या हाती असलेल्या फलकांवर होता.

या प्रकारानंतर भारतीय लष्कराने वाटाघाटी करण्यासाठी एक पथक न्यू पेट्रोल चौकीकडे पाठवले. मात्र, चिनी जवानांनी परतण्यास नकार दिला. याबाबत भारतीय जवानांनी तत्काळ वरिष्ठ अधिका-यांना कळवले.

जुलैमध्ये घुसखोरी
यापूर्वी गेल्या जुलैमध्ये लडाख भागात डेमचोक क्षेत्रात चीनने घुसखोरी केली होती. आता पुन्हा घुसखोरी करून चीनने नवा वाद पेटवला आहे. गेल्या वर्षी चिनी घुसखोरांनी या भागात चक्क तंबू ठोकले होते. मात्र, यंदा फक्त जवान बस्तान बांधून आहेत.

लष्कराकडून घुसखोरीचा इन्कार
उधमपूरस्थिती भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी चिनी घुसखोरीचा इन्कार केला आहे. या भागात दोन्ही देशांत प्रत्यक्ष सीमा आखलेली नसल्यामुळे येथे नेहमी असे प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. काही भागांत आपली सीमा ठराविक अंतरापर्यंत असल्याची दोन्ही देशांची धारणा आहे. त्यामुळे भारतीय हद्दीत घुसखोरी झाली असे म्हणता येणार नाही, असेही गोस्वामी यांनी नमूद केले.