आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबी घटली, पण नेपाळ-बांगलादेशपेक्षा कमीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारतातील गरिबी कमी झाली आहे, या सरकारच्या दाव्याला आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानंतर पुष्टी मिळाली आहे. भारतातील गरिबीचे प्रमाण 1999 ते 2006 या काळात मोठ्या प्रमाणात घटले आहे; परंतु शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळ आणि बांगलादेशच्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

गरिबी कमी करण्याच्या प्रयत्नात नेपाळ आणि बांगलादेश हे देश स्टार परफॉर्मर्स असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. कारण दोन्ही शेजा-यांनी आपल्या गरिबीमध्ये वेगाने घट घडवून आणण्यात यश मिळवले आहे. व्यापक प्रमाणावर गरिबीचे प्रमाण कमी करण्यासाठी मात्र भारत शेजा-यांपेक्षा 50 टक्के अधिक वेगाने वाटचाल करत आहे. ऑक्सफर्डच्या पॉव्हर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (ओपीएचआय) संशोधन केंद्राच्या वतीने हा अभ्यास करण्यात आला. ओपीएचआयने भारतातील गरिबीचे प्रमाण जाणून घेण्यासाठी मल्टिडायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्सचा (एमपीआय) वापर केला. एमपीआयच्या माध्यमातून कुपोषण, शिक्षण, स्वच्छतागृहांची उपलब्धता, राहणीमानाचा स्तर या बाबींवर गरीब लोकांचा अनुभव यातून जाणून घेतला जातो.

शेजा-यांची प्रगती - नेपाळ आणि बांगलादेशने 1999 ते 2006 या काळात गरिबीचे प्रमाण कमी केले. नेपाळने दरवर्षी 4.1, तर बांगलादेशने 3.2 टक्क्यांनी गरिबीतून बाहेर पडण्याचा सपाटा लावला आहे. भारताचे मात्र दरवर्षी सरासरी 1.2 टक्के एवढे प्रमाण आहे.

या राज्यांचा समावेश- व्यापक स्तरावरील गरिबी निर्मूलनाच्या प्रयत्नात बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये काही अंशी निश्चितपणे गरिबी दूर झाली. मात्र केरळ, आंध्र प्रदेश त्यापेक्षा आघाडीवर आहेत.

काय आहे एमपीआय पुअर?- तीन किंवा त्यापेक्षा अधिक गोष्टींपासून व्यक्ती वंचित राहत असतील तर त्यांचा समावेश या अभ्यासात एमपीआय पुअर अशा वर्गवारीत करण्यात आला आहे. एमपीआय पुअरमध्ये 22 देशांचा समावेश आहे. नेपाळ, रवांडा, बांगलादेश या देशांनी या समस्येवर मात करण्यासाठी जोरदार प्रगती सुरू ठेवली आहे. त्यानंतर घाना, टांझानिया, कंबोडिया, बोलव्हिया या देशांचा समावेश होतो. हे देशही गरिबीतून बाहेर पडू लागले आहेत.