वॉशिंग्टन - काळ्या पैसेवाल्या देशांच्या यादीत भारत जगात तिस-या स्थानी आहे. एका आंतरराष्ट्रीय ‘थिंक टँक’ने केलेल्या पाहणीत सन २०१२ मध्ये परदेशात ठेवलेल्या काळ्या पैशाच्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट झाली. सन २०१२ मध्ये देशातून जवळपास ६ लाख कोटी रुपये (९४.७६ अब्ज डॉलर) देशाबाहेर गेल्याचे या पाहणीत आढळले.
वॉशिंग्टनमधील ग्लोबल फायनान्शियल इन्टेग्रिटी (जीएफआय) या थिंक टँकने यासंदर्भात पाहणी करून २०१४ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, २००३ ते २०१२ या दहा वर्षांच्या काळात भारतातून २८ लाख कोटी रुपये (४३९.५९ अब्ज डॉलर) एवढा काळा पैसा देशाबाहेर गेला. २०१२ मध्ये ज्या देशांमधून काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला त्या देशांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो. चीनमधून २४९.५७ अब्ज डॉलर परदेशात पाठवण्यात आले. रशिया या यादीत दुस-या क्रमांकावर असून १२२.८६ अब्ज डॉलर एवढा काळा पैसा तेथून बाहेर पाठवण्यात आला.
२००३ ते २०१२ या १० वर्षांच्या काळात विकसनशील अर्थव्यवस्थांमधून ६.६ ट्रिलियन डॉलर एवढा काळा पैसा देशाबाहेर पाठवण्यात आला. भारतातून या कालावधीत ४३९.५९ अब्ज डॉलर एवढा काळा पैसा बाहेर पाठवण्यात आला. एकूण १० वर्षांच्या कालावधीच्या रँकिंगचा विचार करता भारत चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या आधी चीन (१.२५ ट्रिलियन डॉलर), रशिया (९७३.८६ अब्ज डॉलर) आणि मेक्सिको (५१४.२६ अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो.
जीएफआय या आंतरराष्ट्रीय थिंक टँकचा अहवाल
भारताचा वाटा १० टक्के
२०१२ मध्ये सर्व विकसनशील आणि उदयोन्मुख देशांमधून ९९१.२ अब्ज डॉलर एवढी विक्रमी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली. त्यात भारताचा वाटा जवळपास १० टक्के (९४.७६ अब्ज डॉलर) आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि कर चुकवेगिरी याच कारणांमुळे हा काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला.
दशकभरात चढता आलेख
२००३ नंतर काळ्या पैशाचा आलेख चढता आहे. २००३ मध्ये ही रक्कम २९७.४ अब्ज डॉलर एवढी होती. २०१२ मध्ये ही रक्कम तब्बल ९९१.२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली, असे या अहवालात म्हटले आहे. जीएफआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ डेव्ह कार आणि कनिष्ठ अर्थतज्ज्ञ जोसेफ स्पँजर्स यांनी हा अहवाल तयार केला आहे.