आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या मंगळ यानाने अर्धे अंतर कापले, 15 सेकंदात संदेशाची आदानप्रदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- पृथ्वी आणि मंगळामधील अर्धे अंतर भारताच्या मंगळ मोहिमेअंतर्गत पाठविण्यात आलेल्या मानवरहित अवकाश यानाने कापले आहे. पृथ्वीवरून या यानाला संदेश पाठविण्यात आला आणि यानानेही एक संदेश पृथ्वीवरील केंद्राला पाठविला. याला केवळ 15 सेकंद लागल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.
इस्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी 09.50 वाजता मानवरहित अवकाश यानाने पृथ्वी आणि मंगळ या ग्रहांमधील अर्धे अंतर कापले. भारताच्या अवकाश संशोधन इतिहासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आतापर्यंत या यानाने तब्बल 337.5 मिलियन किलोमीटर एवढे अंतर पार केले आहे.
सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करताना पृथ्वी आणि मंगळ यांच्या कक्षा काल जवळ आल्या होत्या. याच्या दुसऱ्याच दिवशी भारताच्या मानवरहित अवकाश यानाने अर्धे अंतर पार केले आहे, हा एक दुर्मिळ योगायोग म्हणता येईल.
नासाच्या जेट प्रोपोल्शन लेबॉरेटरीच्या मदतीने डिप स्पेस नेटवर्कच्या माध्यमातून भारताच्या यानावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. या यानात पाच अत्याधुनिक उपकरणे असून यानाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी या उपकरणांवर वेळोवेळी प्रयोग करण्यात येत आहेत.