आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan News In Marathi, Kashmir Issue, Divya Marathi

काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी चर्चा केल्याने पाकबरोबरील बोलणी भारताने केली रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी चर्चा सुरू करून पाकिस्तानाने भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये नाक खुपसल्यामुळे कठोर भूमिका घेत भारताने 25 ऑगस्ट रोजीची परराष्ट्र सचिवस्तरीय बोलणी रद्द केली आहे. अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ कधीही खपवून घेतली जाणार नाही, असा संदेशच भारताने कुरापतखोर पाकिस्तानला दिला आहे.

दरम्यान भारताचा हा निर्णय द्विपक्षीय संबंधांना मोठा धक्का असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. बोलणीसाठी भारत किंवा फुटीरतावादी यापैकी एक पर्याय स्वीकारा, असे परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी निक्षून सांगूनही पाकच्या भारतातील राजदूताने फुटीरतावाद्यांशी बोलणी केल्यामुळे भारताने ही कठोर निर्णय घेतला. विद्यमान परिस्थिती पाहता पुढच्या आठवड्यात परराष्ट्र सचिवांना इस्लामाबादला पाठवण्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे सांगत बोलणीच रद्द करण्यात आली आहे.

पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये सातत्याने ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असून तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानी राजदूतांनी हुरियत कॉन्फरन्सच्या तथाकथित नेत्यांशी बोलणी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्याच दिवशी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या विधायक राजनैतिक प्रयत्नांवर पाणी फेरले गेले आहे. अशा कडक शब्दांत भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचे भारतातील राजदूत अब्दुल बासीत यांना सुनावले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने युद्धबंदी मोडून गोळीबार केला जात असल्यामुळे उभय राष्ट्रांतील परराष्ट्र सचिवस्तरीय बोलणी स्थगित करण्यात आली होती. पूर्वनियोजित कार्यक्रमामुसार 25 ऑगस्ट रोजी ही बोलणी सुरू होणार होती. त्यासाठी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग इस्लामाबादला जाणार होत्या.

शिमला करार, लाहोर घोषणापत्रान्वयेच चर्चा हाच पर्याय
भारताबरोबरचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिमला करार आणि लाहोर घोषणापत्रांतील तरतुदींनुसार द्विपक्षीय चर्चा हा पाकिस्तानसमोर एकमेव उपलब्ध पर्याय आहे. पण पाकिस्तानची तशी इच्छाच दिसत नसल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी इस्लामाबादेत होणा-या परराष्ट सचिवस्तरीय चर्चा करण्यात काहीच अर्थ उरत नसल्याने ही बोलणी रद्द करण्यात आली आहे.

फुटितावाद्यांना गोंजारण्याची जुनीच खोड
पाकिस्तानच्या भारतातील राजदूतांनी द्विपक्षीय पराराष्ट्र सचिवस्तरीय बोलणीच्या तोंडावरच काश्मिरातील हुरियत कॉन्फरन्सच्या फुटिरतावादी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले. यापूर्वीही भारताशी कोणतीही राजनैतिक बोलणी करण्याच्या आधी पाकिस्तानने काश्मिरातील फुटिरतावाद्यांशी नेहमीच चर्चा केली आहे. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भारत दौ-यावर आले तेव्हाच पाकिस्तानने या परंरपरेला छेद दिला होता.

हुरियताची काँग्रेस- भाजपवर आगपाखड
पाकिस्तानी राजदूताच्या फुटिरतावाद्यांशी बोलणीला काँग्रेस आणि भाजपने विरोध केल्यामुळे हुरियत कॉन्फरन्सने या दोन्ही पक्षांवर आगपाखड केली आहे. या बोलणीला विरोध करून काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यास काँग्रेस कधीच उत्सुक नसल्याचे आणि भाजप वस्तुस्थितीपासून दूर पळत असल्याचे स्पष्ट होते, असे हुरियतचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी म्हटले आहे.

काश्मिरी फुटीरतावाद्यांशी चर्चेच्या उचापतीमुळे कठोर भूमिका
‘द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारत गांभीर्याने प्रयत्न करत असताना पाकच्या राजदूताने हुरियतच्या नेत्यांना चर्चेला बोलावले. भारताच्या अंतर्गत बाबीत ही ढवळाढवळ आम्ही खपवून घेणार नाही.’
- सय्यद अकबरुद्दीन, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते.

पाकमधील काही शक्तींना शांतता पचनी पडत नाही. पाकने मोदींना नीट समजूनच घेतले नाही. भारताची सुरक्षा आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर जगातील कोणत्याही शक्ती तडजोडी करू शकत नाहीत.
-एम. जे. अकबर,
भाजपचे प्रवक्ते

भारत की फुटीरतावादी यापैकी कोणाशी बोलणी करायची हे पाकनेच ठरवावे. भारताने चर्चेसाठी पुढाकार घेतला,पण पाकिस्तानने फुटीरतावाद्यांना चर्चेला बोलावल्याने त्यांच्या हेतूबद्दलच शंका येते.
-जी. पार्थसारथी,
भारताचे पाकमधील राजदूत

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाक कोणतीच पावले उचलत नाही.पाकिस्तानकडून सातत्याने युद्धबंदी मोडणे सुरू असताना द्विपक्षीय बोलणी सुरू करावी असे मोदींना का वाटले, याचे स्पष्टीकरण द्या.
- आनंद शर्मा,
काँग्रेसचे प्रवक्ते

भारतीय चौक्यांवर रात्रभर गोळीबार
एकीकडे फुटीरतावाद्यांशी चर्चा करणा-या पाकने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आर. एस. पुरा आणि अर्निया क्षेत्रातील 20 भारतीय चौक्यांवर रविवारी रात्रभर गोळीबार केला. त्यामुळे या भागातील रहिवासी धास्तावले आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानकडून 12 वेळा युद्धबंदी मोडण्यात आली आहे.