आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Pakistan Relation, Divya Marathi, High Commissioner Abdul Basit

भारताचा आक्षेप धुडकावून पाकची फुटीर नेत्यांशी चर्चा; पाकच्या उच्चायुक्तांची मलिक, गिलानींशी भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताच्या कठोर पवित्र्याचा कुठलाही परिणाम पाकिस्तानवर झाल्याचे चिन्ह नाही. पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी मंगळवारी दुस-याच दिवशी आपल्या वर्तनातून त्याची जाणीव करून दिली. भारताने आक्षेप घेऊनही बासीत यांनी काश्मीरमधील सय्यद अली शाह गिलानी व यासीन मलिक या फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतली. या वेळी पाक उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनेही झाली.

बासीत हे मीरवाईज उमर या आणखी एका फुटीरतावादी नेत्याची भेट घेणार आहेत. त्यांनी सोमवारी जम्मू आणि काश्मीर डेमॉक्रॅटिक फ्रीडम पार्टीचे नेते शब्बीर शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच मोदी सरकारने पाकसोबत 25 ऑगस्टची परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चा रद्द केली होती. भारताचा हा निर्णय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान व अमेरिकेने दिली होती. बासीत व गिलानी यांची मंगळवारची बैठक दीड तास चालली. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द करण्याचा भारताचा निर्णय दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया या भेटीपूर्वी गिलानी यांनी नोंदवली. ‘हुरियतच्या नेत्यांनी यापूर्वी अनेकदा पाकच्या उच्चायुक्तांशी चर्चा केली आहे. त्यात नवे काही नाही. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, ही भारत सरकारची भूमिका योग्य नाही. काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे,’ असे गिलानी यांनी ठासून सांगितले.

बासीत यांनी फुटीरतावाद्यांसोबतची बैठक रद्द करावी. भारताशी चर्चा करायची की काश्मिरी फुटीरवादी नेत्यांशी याचा निर्णय पाकिस्ताननेच घ्यावा.
- सुजाता सिंह, भारताच्या परराष्ट्र सचिव.

पाकिस्तान भारताच्या तंत्राने चालणार नाही. आम्ही सार्वभौम देश आहोत. काश्मीर हा भारताचा भाग नाही. तो वादग्रस्त प्रदेश आहे.
- तसनीम अस्लम, प्रवक्त्या, पाक परराष्ट्र मंत्रालय

पाकशी चर्चा करण्याचा निर्णयच मुळात का घेतला याचे आश्चर्य वाटते. मोदी सरकारबाबतचे पाकचे धोरण सुस्पष्ट नाही. भारत सरकारचा सल्ला न मानणा-या बासीत यांना पाकिस्तानला परत पाठवावे.

- आनंद शर्मा, कॉंग्रेस प्रवक्ता
भारत-पाक चर्चा रद्द होणे दुर्दैवी आहे, पण दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सर्व प्रक्रियांना आम्ही पाठिंबा देत राहू. उभय देशांनी मिळूनच काश्मीर प्रश्न सोडवावा अशी अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे, - मेरी हर्फ, उपप्रवक्त्या, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय

हिंदू सेनेची निदर्शने
हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी उच्चयुक्तालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी ‘वंदे मातरम्’ आणि ‘पाकिस्तानी उच्चयुक्तांना परत पाठवा’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी त्यापैकी काहींना ताब्यातही घेतले.