टोकियो - भारत, जपान, अमेरिका, चीन आणि कॅनडा हे देश संयुक्तरीत्या जगातील सर्वाधिक क्षमतेचा टेलिस्कोप तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. हवाई बेटावर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ५०० किमी अंतरावरील नाण्याच्या आकाराएवढा घटक सहज शोधता येण्याची क्षमता या टेलिस्कोपमध्ये असेल. हा ३० मीटर लांबीचा टेलिस्कोप माउना किया ज्वालामुखीजवळ स्थापित करण्यात येत असून याच्या बनावटीसाठी १.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च येणार आहे.
या टेलिस्कोपचे काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणार असून एकूण खर्चाचा एक चतुर्थांश खर्च जपान करणार आहे. पाच देशांतील १०० अंतराळ व खगोलतज्ज्ञ सध्या यावर काम करत आहेत. या टेलिस्कोपला ‘टीएमटी’ असे नाव देण्यात आले आहे. सध्या जगातील सर्वाधिक क्षमतेचा टेलिस्कोप जपानकडे आहे. जपानच्या या सुबारू टेलिस्कोपपेक्षा टीएमटीची क्षमता १३ पट जास्त असेल. ‘बिग बँग’नंतर ८०० कोटी वर्षांनी अस्तित्वात आलेल्या ता-यांचे निरीक्षणही या टेलिस्कोपने करता येईल, असा वैज्ञानिकांना विश्वास आहे. सूर्यमंडळाबाहेरील जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्यासाठी या टेलिस्कोपचा प्रभावी वापर करता येणार आहे.