कोलंबो - श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपाक्षे यांच्या पराभवात भारताची गुप्तचर संस्था असलेल्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चा हात होता, असे वृत्त समोर आले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने गोपनीय सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर भारताला कोलंबोमध्ये असलेल्या भारतीय गुप्तचर संस्थेच्या श्रीलंकेतील प्रमुखाला परत बोलवावे लागले होते. या एजंटवर नुकत्याच झालेल्या राष्ट्रापतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार मैत्रिपाल सिरीसेना (विद्यमान राष्ट्रपती) यांची मदत केल्याचा आरोप लावण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. एका रुटीन प्रक्रियेप्रमाणे ही केवळ बदली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोलंबो आणि नवी दिल्लीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेने भारतीय एजंटवर राजपाक्षे यांच्या मंत्रिमंडळाला धोका दिल्याचा आणि विरोधी उमेदवार सिरिसेना यांना मदत केल्याचा आरोप लावत त्या एजंटला परत बोलावण्यास सांगितले होते. 28 डिसेंबरलाच श्रीलंकेच्या 'संडे टाइम्स' मध्ये रॉचे विरोधी पक्षाबरोबर संबंध असल्याचे वृत्त आले होते. दुस-या एका माध्यमातीव वृत्तानुसार, श्रीलंकेच्या एका खासदाराने सांगितले की, रॉच्या प्रमुखांनी पंतप्रधान रानील विक्रमासिंघे यांना राजपक्षे यांचा पराभव करण्यास सांगितले होते. खासदाराच्या मते रॉचे प्रमुख देशाचे माजी राष्ट्रपती चंद्रिका कुमारतुंगा यांच्या संपर्कातही होते. तर विक्रमसिंघे यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, माझी एजंटबरोबर एक किंवा दोन वेळा भेट झाली. पण मी त्याला ओळखत नाही.
राजपक्षे यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार
महिंदा राजपाक्षे यांनी या प्रकरणी काहीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. ठोस पुरावा मिळेपर्यंत
आपण कोणावरही विश्वास ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नवे राष्ट्रपती सिरीसेना यांनी पहिल्या परदेश दौ-यासाठी पुढील महिन्यात भारतात जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या अजेंड्यात भारत अग्रस्थानी असल्याचे ते म्हणाले.