आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या अजेंड्यावर ओबामा प्रशासन फिदा, दौर्‍याआधीच परराष्ट्रमंत्र्यांकडून प्रशंसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सर्वंकष विकासासाठी दिलेली ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणा अमेरिकेला भावली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी या घोषणेतून मोदी यांनी दिलेला विकासाचा मंत्र महान असल्याचे गौरवोद्गार केरी यांनी काढले आहेत. केरी भारताच्या दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍याच्या पूर्वसंध्येला त्यांनी मोदी सरकारविषयी हे मत व्यक्त केले.

भारत-अमेरिकेच्या पाचव्या वार्षिक सामरिक चर्चेसाठी केरी भारतात येत आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी ते चर्चा करतील. केरी यांनी मोदींच्या सर्वसमावेशक विकास दृष्टिकोनाची प्रशंसा केली आहे. भारताबाबतच्या परराष्ट्रविषयक धोरणावरील भाषणात त्यांनी आपले सरकार भारतासोबत एकत्र काम करण्यास तयार असल्याचे सांगितले.
भारतातील नव्या सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेतून मांडलेल्या संकल्पनेस आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो. हा एक महान दृष्टिकोन आहे यावर आमचा विश्वास आहे. येथील खासगी क्षेत्रातील भागीदार भारताच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदान देऊ इच्छित असल्याचे केरी यांनी सांगितले. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या थिंक टँकने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय तरुणांमध्ये नैसर्गिक गुण
दोन्ही देशांतील तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी परस्परांमध्ये शैक्षणिक भागीदारी वाढवणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेमध्ये तरुणांत उत्साह निर्माण केला होता, याची मला जाणीव आहे. भारत मोठ्या लोकसंख्येचा देश आहे हे सांगत असताना त्यांनी भारतामध्ये सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे, याकडेही वेळोवेळी लक्ष वेधले होते. तरुणांमध्ये विकास प्रक्रिया गतिमान करण्याचे नैसर्गिक गुण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. या गुणांना चालना देण्याची भारताची जबाबदारी आहे. यासोबत दोन्ही देशांचे ते कर्तव्य आहे, असे केरी म्हणाले.

अमेरिकी कंपन्या योगदानास तयार
भारताला हव्या असलेल्या क्षेत्रात अमेरिकी कंपन्या नेतृत्व करू शकतात. उत्पादन, पायाभूत सुविधा, आरोग्य क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील अमेरिकी कंपन्यांच्या सहभागातून भारताची विकास प्रक्रिया गतिमान होईल, असे केरी यांनी स्पष्ट केले. भारताला कुशल मनुष्यबळ हवे आहे. अमेरिकी विद्यापीठे 21 व्या शतकासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सक्षम आहेत. अमेरिकी विद्यापीठांमध्ये दरवर्षी 1 लाख भारतीय विद्यार्थी शिकत असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्यमशीलतेसाठी तंत्र शिक्षण आवश्यक
व्यावसायिक शाखेतील मनुष्यबळासाठी उभय देशांनी तांत्रिक शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. दोन्ही देशांमध्ये उद्यमशील व संशोधनात्मक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. भारतीय लोक असामान्य काम करण्यास सक्षम असतात, त्यामुळे ही संधी आपण गमावू नये, असे केरी म्हणाले.