आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- अभिनेता शाहरुख खान सध्या एका वादग्रस्त चर्चेत आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार हाफिज सईदने त्याला पाकिस्तानात स्थायिक होण्याचे आमंत्रण दिल्यानंतर आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी या वादात उडी घेतली आहे. भारताने शाहरुखला सुरक्षा दिली पाहिजे, असे मलिक म्हणाले. मलिक यांच्या वक्तव्यावरुन भारतात नाराजी व्यक्त होत असून त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यांमध्ये नाक खुपसू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.
केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंह यांनी मलिक यांना सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यास समर्थ आहोत. ते आमचे काम आहे. यासंदर्भात कोणी सांगण्याची गरज नाही.
मलिक यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसने प्रत्युत्तर देताना सांगितले की, पाकिस्तानने आधी स्वतःचे घर ठीक करावे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी सांगितले की, भारतात कायदा सर्वांसाठी सारखा आहे. पाकिस्तानी नेत्यांनी अशी वक्तव्ये देण्यापेक्षा त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करावे. तर मलिक यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.
शिवसेनेच्या 'दोपहर का सामना' या वर्तमानपत्राचे संपादक प्रेम शुक्ला यांनी कडाडून टीका करताना सांगितले की, पाकिस्तानात त्यांचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि स्वतः रेहमान मलिक जेवढे सुरक्षित नाहीत, त्यापेक्षा जास्त सुरक्षित शाहरुख खान भारतात आहे. पाकिस्तानात त्यांच्याच सैन्य बंडाच्या पावित्र्यात येते तेव्हा झरदारींना पळण्यासाठी विमान तयार करावे लागलते. मशिदी तसेच दर्गे पाकिस्तानात असुरक्षित आहेत.
शुक्ला म्हणाले, शाहरुख खान भारतात जन्मला नसता तर एवढा मोठा स्टार झाला नसता. भारतात असल्यामुळेच शाहरुख, आमिर आणि सलमान खान एवढे मोठे स्टार आहेत. इस्लाममध्ये चित्रपटात काम करणे 'हराम' आहे आणि पाकिस्तानात हाफिज सईदसारख्या कट्टरवाद्यांनी त्यांना काम करु दिले असते का? पाकिस्तान भारतातील मुस्लिमांना भडकाविण्यांचे काम करीत आहे. पाकिस्तानचा हा डाव उधळून लावण्यासाठी भारतातील मुस्लिम संघटीत होऊन समोर आले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.