बगदाद/नवी दिल्ली - इराकच्या नजफ प्रांतामध्ये शेकडो भारतीय कामगार अडकून पडल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. जीवाच्या भीतीपोटी या कामगारांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे.परंतु त्यांच्या मालकांनी पासपोर्ट परत करण्यास नकार दिला आहे आणि एजंटांनी हात झटकले आहेत.दरम्यान, नजफमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय अधिकारी उद्या रविवारी नजफला जाणार आहेत.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाच्या स्वयंसेवकांनी काही भारतीय कामगारांशी फोनवर संवाद साधला.या कामगारांना पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नसून त्यांचे पासपोर्टही कब्जात घेण्यात आले आहेत असेही अॅम्नेस्टीने सांगितले. रक्तपातामुळे भीती वाटत असून आम्ही कंपनीतच स्वत:ला कोंडून घेतले आहे.पासपोर्ट नसल्याने देश सोडता येत नाही. अशी व्यथा एका कामगाराने कथन केली.