आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय वाइनची लंडनमध्ये धूम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताचा आणि वाइनचा तसा फारसा संबंध जोडला जात नाही. मात्र, लंडनमध्ये सुरू असलेल्या ‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’ प्रदर्शनात मसाले, चहा आणि कॉफी या प्रसिद्ध उत्पादनांबरोबरच स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या भारतीय वाइनच्या बाटल्या सर्वांचेच आकर्षण ठरल्या आहेत.
ब्रिटनमधील वेट्रोजसारख्या काही सुपरस्टोअर्समध्ये प्रसिद्ध भारतीय वाइनचे ब्रॅण्ड्स विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यांना मागणीही चांगली असल्यामुळे 2015पर्यंत भारतीय वाइनची निर्यात 100 कोटींपेक्षाही जास्तीचा आकडा गाठण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये भरवण्यात आलेले ‘फ्लेवर्स ऑफ इंडिया’हे प्रदर्शन ऑलिम्पिकचे प्रेक्षक आणि अन्य पर्यटकांची गर्दी खेचत आहे. मसाले आणि खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाणा-या भारतीय प्रदर्शनात स्टॉल्सवर भारतीय वाइन्सच्या बाटल्या पाहून प्रदर्शनाला भेट देणा-याला आश्चर्याचा सुखद धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक वाइनच्या बाजारपेठेत भारताने नव्यानेच पाऊल ठेवले आहे. द्राक्षांच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे फ्लेवर्सची उपलब्धता, कमी व्यावसायिक निर्बंध यामुळे अल्पावधीतच भारत या बाजारपेठेतील महत्त्वाचा घटक ठरला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. येत्या पाच वर्षांत भारतीय वाइनच्या निर्यातीत 100 टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा कृषी आणि प्रक्रियायुक्त उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीईडीए) व्यक्त केली आहे. भारतातून सध्या दरवर्षी वाइनच्या 10 लाख बाटल्यांची निर्यात करण्यात येते. ब्रिटनमध्ये भारतीय वाइन हळूहळू आपले बस्तान बसवत असली तरी जपान, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, घाना, फ्रान्स आणि न्यूझीलडंमध्ये भारत हा वाइनचा प्रमुख निर्यातदार आहे.