आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची मंगळ मोहीम : ब्रिटिशांच्या पोटात गोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- भारताने मंगळ मोहिमेची घोषणा केल्यामुळे ब्रिटनकडून भारताला दरवर्षी दिल्या जाणार्‍या 280 दशलक्ष पाउंड्सच्या मदतीवरून नव्याने वादंग उठले आहे. मंगळावरील मोहिमेसारखे प्रचंड खर्चीक कार्यक्रम जर भारताला परवडत असतील तर दरवर्षी एवढी मदत देण्यात काय हशील आहे, असा सवाल तेथे विचारला जाऊ लागला आहे.
स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली. त्यानंतर ब्रिटिश माध्यमांनी भारताला दिल्या जाणार्‍या अर्थसाहाय्याकडे बोट दाखवत वादाला तोंड फोडले आहे. ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीमुळे निधी कपात, नोकर्‍यांची वानवा आणि प्रचंड मोठय़ा आर्थिक तुटीचे संकट ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून अन्य राष्ट्रांना दिले जाणारे अर्थसाहाय्य हा अत्यंत संवेदनशील मुद्दा बनला आहे. प्रचंड आर्थिक संकटातून जात असलेल्या ब्रिटनने अन्य देशांना द्यावयाच्या अर्थसाहाय्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मात्र कपात केली नाही.
त्यामुळे भारतासारख्या 'श्रीमंत' देशाला अर्थसाहाय्य देणे तातडीने बंद करा, अशी मागणी तेथील खासदार आणि लोकांमधूनही सातत्याने केली जाऊ लागली आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंगळ मोहिमेच्या घोषणेनंतर ब्रिटनमधील माध्यमांनी पुन्हा अर्थसाहाय्याचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. 'भारताला मंगळावर रॉकेट पाठवण्यासाठी आपण पैसे देतो' अशा शीर्षकाखाली 'डेली एक्स्प्रेस'ने वृत्त प्रकाशित करून अर्थसाहाय्य देण्याची गरजच काय, असा सवाल केला आहे. भारताने मंगळ मोहिमेची घोषणा केल्याबरोबर ब्रिटिशांना संताप अनावर झाला आहे.
त्यामुळे भारताला दिली जाणारी मदत तातडीने बंद करा, अशी मागणी केली आहे. 2015 पर्यंत भारताला दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करणार नाही, असे आश्वासन कॅमरून सरकारने दिले आहे.
लोकांची काळजी घेता येत नाही का?- भारताला जर मंगळ मोहिमेसारख्या हायटेक योजना परवडत असतील तर त्यांच्या लोकांची काळजी घेण्यासही भारत सर्मथ आहे. ब्रिटिश करदात्यांच्या खिशाला कात्री लावून भारताला लक्षावधी पाउंड्स देण्याची गरजच काय? '' - फिलिप डेव्हिस, सत्ताधारी कॉन्झव्र्हेटिव्ह खासदार
गरज नसताना देता कशाला?- भारताला गरज नसताना आणि ते मागणीही करत नसताना आम्ही कशासाठी लक्षावधी पाउंड्स देत आहोत? लक्षावधी पाउंड्सची मदत घ्या म्हणून आमचे सरकार भारताला याचना का करते आहे? मंगळ मोहीम हे भारताचे भवितव्य असेल तर आम्हीही भविष्यात मदतीसाठी योग्य निवड केली पाहिजे. कदाचित आपल्या स्वत:च्याच लोकांना ती मदत दिली पाहिजे. '' -पॉल नट्टाल्ला, स्वतंत्र ब्रिटिश पक्षाचे खासदार