वॉशिंग्टन (अमेरिका)- बलात्कार आणि हत्येप्रकरणी अमेरिकेतील दोन भाऊ तब्बल 30 वर्षांपासून तुरुंगात होते. त्यातील एकाला तर मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. परंतु, नुकत्याच करण्यात आलेल्या DNA चाचणीत दोघेही भाऊ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आहे.
वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या दोन भावांना लगेच मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यांना जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली होती तेव्हा एक भाऊ 19 वर्षांचा तर दुसरा 15 वर्षांचा होता. आता मानसिक क्षतिग्रस्त झालेला हेन्री मॅकुलम तब्बल 50 वर्षांचा आहेत. दुसरा भाऊ लियोन ब्राऊन 46 वर्षांचा आहे.
1986 मध्ये कॅरोलाइना येथील 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी दोघांना तुरुंगात टाकण्यात आले होते. घटना घडलेल्या जागेवरुन घेण्यात आलेल्या DNA नमुन्यांवरून आता सिद्ध झाले आहे, की गुन्हेगार दुसरेच कुणी आहेत. विशेष म्हणजे हे गुन्हेगार याच तुरुंगात दुसऱ्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत.
असे आहे प्रकरण
1983 मध्ये उत्तर कॅरोलाइना येथील रेड स्प्रिंग्ज वस्तीत 11 वर्षीय मुलगी सबरीना बुए हिचे अर्धनग्न शरीर मिळाले होते. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय होता. या प्रकरणी काही दिवसांनी मॅकुलम आणि ब्राऊन यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी मारहाण केल्यावर दोघांनी गुन्हा कबुल केला. दरम्यान, पोलिसांनी दबाव टाकल्याने गुन्हा कबुल केल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते. परंतु, तेव्हा न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
(फोटो- हेन्री मॅकुलम आणि लियोन ब्राऊन.)