आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internation News: After Opposition Bycott Election Went In Peacefull Manner In Thailand

आंतरराष्‍ट्रीय वार्ता: विरोधकांच्या बहिष्कारानंतरही थायलंडमध्ये शांततेत मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतरही थायलंडमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडली. निवडणुकीसाठी देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांनी रविवारी सकाळीच प्रसारमाध्यमांच्या समोर आपला हक्क बजावला. पंतप्रधान निवासस्थानापासून जवळ असलेल्या क्लाँग लामचिअ‍ॅक स्कूल येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. टीव्ही वाहिन्यांच्या पत्रकारांची या वेळी गर्दी झाली होती. मतदानावर बहिष्कार टाकणा-या विरोधी गटातील लोक शाळेबाहेर निदर्शने करतील, असा अंदाज होता. परंतु तसे दिसून आले नाही. सर्व मतदान केंद्रांवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
ईशान्येकडील प्रदेशात सत्ताधारी फेऊ थाई पार्टीचे वर्चस्व आहे. यिंगलूक यांच्या प्रदेशातील 127 पैकी 122 मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान झाले. दरम्यान, देशभरात किरकोळ हिंसाचाराच्या घटनांत अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया रद्द झाली. 9 प्रदेशांतील 45 मतदारसंघांत अडथळ्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली आहे. त्या ठिकाणी 23 फेब्रुवारीला नव्याने मतदान घेतले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीपासून देशात सुरू झालेल्या हिंसाचारात 10 जण ठार झाले. यिंगलूक यांनी गैरमार्गाने पंतप्रधानपद मिळवले आहे. त्यांनी सत्ता सोडावी. त्यांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी देशातील बंडखोरांनी आंदोलन छेडले आहे.
काही ठिकाणी अडथळे
निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळे आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न देशातील काही भागात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकॉकच्या दक्षिणेकडील भागातील मतदान प्रक्रिया खंडित झाल्याचे दिसून आले होते. 14 पैकी 9 ठिकाणी होणारे मतदान स्थगित करावे लागले.
भारताचा इशारा
निवडणुकीला कडाडून विरोध होत असल्याने नजीकच्या काळात हिंसाचार वाढू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा भारत सरकारने भारतीय नागरिकांना अगोदरच दिला.
127 । एवढ्या देशभरातील केंद्रांवर मतदान प्रक्रियेत अडथळा
375 । एकूण मतदारसंघ.