आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International Politics: India Bangladesh Bondary Dispute After 42 Years Over

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्‍ट्रीय राजकारण: भारत-बांगलादेश सीमावाद 42 वर्षांनंतर संपुष्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा - भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यानचे सीमारेषेसंदर्भातील सर्व प्रलंबित वादविवाद 42 वर्षांनंतर निकाली निघाले असून उभय देशांमध्ये आता कोणताही सीमावाद राहिला नसल्याची घोषणा दोन्ही देशांच्या भूमी अभिलेख विभागाच्या उच्चाधिका-यांच्या परिषदेत रविवारी करण्यात आली.
प्रलंबित सीमाप्रश्न सोडवण्यासाठी गुरुवारपासून येथे 82 वी भारत-बांगलादेश संयुक्त सीमारेषा परिषद आयोजित करण्यात आली होती. तीन दिवस चाललेल्या या परिषदेचा शनिवारी समारोप झाला. चर्चेनंतर या दोन शेजारी देशांनी सर्व वादविवाद सामोपचाराने सोडवून आता कोणताही वाद शिल्लक राहिला नसल्याची घोषणा केली. भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी पश्चिम बंगालमधील प्रदेश, त्रिपुरामधील चंदननगर परिसर, दक्षिण त्रिपुरातील मुहुरी नदीकाठचा चार परिसर या ठिकाणच्या सीमाप्रश्नांसह सर्व प्रलंबित सीमाप्रश्न निकाली काढण्यात यश मिळवले असून उभय देशांदरम्यान अंतिम सीमारेषेची आखणीही पूर्ण करण्यात यश मिळवले आहे, असे बांगलादेशचे भूमी अभिलेख महासंचालक अब्दुल मन्नान आणि भारत सर्वेक्षण कार्यालयाचे संचालक एन. आर. बिस्वाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. या तीनदिवसीय परिषदेत सहासदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बिस्वाल यांनी, तर बांगलादेशच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व मन्नान यांनी केले. सीमेवरील योग्य ठिकाणच्या नासधूस झालेल्या खांबांची पुनर्बांधणी आणि दोन देशांतील प्रलंबित सीमाप्रश्न निकाली काढणे हा या परिषदेचा मुख्य अजेंडा होता.
अंतिम सीमेची आखणी करण्यात उभय देशांना यश
सप्टेंबर 2011 मध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ बांगलादेशला गेले होते तेव्हा भारत आणि बांगलादेशचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री अनुक्रमे एस. एम. कृष्णा आणि दीपू मोनी यांनी उभय देशांमधील सर्व सीमाप्रश्न सोडवण्याच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्ष-या केल्या होत्या. त्या करारान्वयेच दोन देशांमधील सीमाप्रश्न निकाली काढण्यात आला.
नोव्हेंबरमध्ये सर्वेक्षण
दक्षिण त्रिपुरा-खाग्राचेरी जिल्हा, चित्तगाँग, गोमटी- खाग्राचेरी, खोवई- हबीगंज, मौलाबी बाजार, पश्चिम त्रिपुरा- ब्राह्मणबारिया या सीमेचे सर्वेक्षण येत्या नोव्हेंबरपासून करण्याच्या निर्णयावर उभय देशांचे एकमत झाले. हा काही वादाचा विषय नाही, सामान्य बाब आहे, असे अधिका-यांनी सांगितले.
सीमेवर काटेरी कुंपण
भारत-बांगलादेशदरम्यान असलेल्या सीमेच्या बहुतांश भागावर काटेरी तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना रोखणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. उर्वरित कुंपण घालण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे.
दोन्ही संसदांची मंजुरी आवश्यक
सर्व प्रलंबित सीमाप्रश्न निकाली काढण्यात आले आहेत. मात्र, त्यांना दोन्ही देशांच्या संसदेची मंजुरी आवश्यक आहे. उभय संसदेमध्ये मंजुरी मिळण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत, असे भारत आणि बांगलादेशच्या अधिका-यांनी म्हटले आहे.