आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Politics : Today Contitutional Election Held In Nepal

आंतरराष्‍ट्रीय राजकारण: नेपाळमध्ये आज हलणार लोकशाही प्रणालीचा पाळणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - देशातील राजकीय अस्थैर्य संपवण्यासाठी नेपाळमध्ये मंगळवारी घटना समितीसाठी निवडणूक होऊ घातली आहे. माओवाद्यांकडून देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे.
देशासाठी अतिशय महत्वाची निवडणूक 19 नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नीलकांता उपरेती यांनी दिली. प्रशासनाने सुरक्षेच्या पातळीवर जोरदार तयारी केली असून सुमारे 2 लाख सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर एक लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रयत्नशील आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या ही मतदान प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी, यासाठी सर्व तयारी झाली आहे. त्यामुळे अडथळे येणार नाहीत. काही गटाचा निवडणुकीला विरोध आहे. परंतु जनतेच्या हक्काचा आदर करायला हवा. त्यामुळे या गटाला विरोध करायचाच असेल तर शांततेच्या मार्गाने आपला निषेध व्यक्त करावा. सरकारने सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पडेल, असा विश्वास उपरेती यांनी व्यक्त केला. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 2008 च्या निवडणुकीत 61 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. 20 नोव्हेंबरला मत मोजणी होईल. प्रातिनिधीक मतदान आणि मतमोजणी या प्रक्रियेसाठी आणखी दोन आठवडे एवढा कालावधी अपेक्षित आहे.
कशी आहे प्रक्रिया ?
देशाच्या 601 सदस्यीय संसदेची निवडणुकीत निवड होईल. हे सभागृह नवीन राज्य घटनेचा मसुदा ठरवेल. त्यात थेट मतदान प्रक्रियेतून 240 सदस्यांची निवड होईल तर 335 सदस्यांची प्रातिनिधीक निवड होईल. उर्वरित 26 सरकारनियुक्त सदस्य असतील.
संपाचे घोडे
अस्थैर्यावर तोडगा निघावा, यासाठी घेण्यात येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माओवादी गटाने नऊ दिवसांचा देशव्यापी वाहतूक संप पुकारला होता. माओवाद्यांनी संपाचे घोडे दामटल्याने मंगळवारपर्यंत चालणार आहे. त्याचा फटका मतदान प्रक्रियेला बसू शकतो.
पहिल्यांदाच ओळखपत्र
देशात लोकशाही अवतीर्ण होऊन काही जेमतेम एक वर्ष झाले आहे. लोकशाही प्रक्रियेत मंगळवारी होणारी निवडणूक पहिल्यांदाच देशव्यापी स्तरावर आहे. प्रथमच देशातील मतदारांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. सुमारे 80 टक्के मतदारांना ओळखपत्र वाटप झाले आहेत.
दोन बाँब सापडले : सपतारी येथील जिल्हा निवडणूक कार्यालयाजवळ दोन बाँब आढळून आले. घातपातासाठी त्याची पेरणी करण्यात आल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले आहे. दोन्ही बाँब निष्क्रिय करण्यात आले आहेत. त्यातील एक बाँब डांग भागातील पोलिस ठाण्याच्या परिसरात आढळून आला. दुसरीकडे जुमला जिल्ह्यातील खालांगा येथे संशयित माओवाद्याने एका बसला पेटवून दिले. मोरांग जिल्ह्यातील मतदान केंद्रावर झालेल्या स्फोटात मात्र एकजण जखमी झाला.
800 जणांना अटक
गेल्या दहा दिवसांपासून माओवादी सीपीएन गटाकडून देशात विविध ठिकाणी हिंसाचार करण्यात येत आहे. विविध घटनांत आतापर्यंत 30 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून 800 पेक्षा जास्त माओवादी सर्मथकांना अटक करण्यात आली आहे.
भारताचे निरीक्षक
लोकशाही बळकटीकरणासाठी होणारी ही मतदान प्रक्रिया जगासाठी खुली रहावी यासाठी नेपाळी निवडणूक आयोगाने परदेशी 235 निरीक्षकांना देशात येण्याची परवानगी दिली आहे. विनोद झुत्शी भारतीय निरीक्षक चमूचे नेतृत्व करत आहेत. युरोपीयन संघटनेने नेपाळमध्ये आपला चमू पाठवला आहे.