वॉशिंग्टन - मोबाइल, स्मार्टफोनच्या वाढत्या प्रसारात इंटरनेटचा वापरही वाढला आहे. मात्र, तरुणांमध्ये इंटरनेटचा अतिवापर होत असेल तर ती एक गंभीर समस्या आहे. इंटरनेटच्या अतिरेकी वापरात व्यसनाधीनतेचे लक्षण दिसून येत असल्याचे संशोधकांच्या अभ्यासात उघड झाले. संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
मिसोरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि ड्यूक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन सायन्सेसमधील शास्त्रज्ञांनी इंटरनेटचा वापर आणि व्यसनाधीनतेवर उपाय या विषयावर अभ्यास केला. चेन्नई येथे 18 डिसेंबर रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स कॉन्फरन्समध्ये याबाबतचा शोधनिबंध मांडण्यात आला.
यादरम्यान सलग दोन महिने 69 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवण्यात आले हेाते. यामध्ये विशिष्ट पद्धतीने होणारा इंटरनेट वापर आणि व्यसनाधीनतेचा संबंध असल्याचे दिसून आले. इंटरनेट वापर आणि व्यसनाधीन व्यक्तीच्या वागणुकीबाबतची माहिती या संशोधनातून मिळाल्याचे मिसोरी विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विषयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. र्शीराम चेल्लपन यांनी सांगितले.
इंटरनेट रिलेटेड प्रॉब्लेम स्केलच्या (आयआरपीएस) धर्तीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 69 विद्यार्थ्यांनी 20 प्रश्नांची उत्तरे दिली. इंटरनेट वापरामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणार्या समस्या 0 ते 200 च्या पट्टीत मोजण्यात आल्या. त्यानुसार व्यसनाधीनतेची लक्षणे समजण्यास मदत झाली. या पट्टीत लालसा, सहिष्णुता, नकारात्मक भाव आदी गोष्टी जाणून घेण्यात आल्या. संशोधकांनी सलग दोन महिने विद्यार्थ्यांचा इंटरनेट वापर ट्रॅक केला.
गेमिंग, चॅटिंगसाठी सर्वाधिक वापर
200 पॉइंट्सच्या पट्टीत विद्यार्थ्यांच्या नोंदी 30 ते 134 दरम्यान राहिल्या. यातील सरासरी स्कोअर 75 होता. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचा सरासरी 7 गीगाबाइट्ससह 140 मेगाबाइट्स ते 51 गिगाबाइट्सपर्यंत इंटरनेट वापर होता. गेमिंग, चॅटिंग, फाइल डाऊनलोडिंग, ई-मेल, ब्राउझिंग, सोशल नेटवर्किंग आदी विविध प्रकारांत इंटरनेट वापरले जाते. आयआरपीएसमध्ये गेमिंग, चॅटिंग आणि ब्राउझिंग सर्वाधिक होत असल्याचे दिसून आले. त्या तुलनेत ई-मेल आणि सोशल नेटवर्किंगसाठी कमी प्रमाणात नेट वापरले जाते.