(फाईल फोटो- माजी नगराध्यक्ष जोस लुइस अबार्का और मारिया दे लोस)
मॅक्सिको- 43 विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याप्रकरणी मॅक्सिकोचे माजी नगराध्यक्ष जोस लुइस अबार्का आणि त्याच्या पत्नीला फेडरल पोलिसांनी अटक केली. सप्टेंबर महिन्यात शहरातील 43 विद्यार्थी बेपत्ता झाले होते. सर्व विद्यार्थ्यांची हत्या झाली असून यात जोसचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
मॅक्सिकोतील इजतापलापामधील जोसच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून जोस आणि त्याची पत्नी मारिया दे लोस हिला ताब्यात घेतले. जोस आणि मारिया दे लोस या दोघांना संशयीत आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. दोघांना अटॉर्नी जनरल ऑफिसच्या कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, एक महिन्यापूर्वी मॅक्सिकोपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या इगुआलामध्ये 100 विद्यार्थी आंदोलन करत होते. पोलिसांसोबत आंदोलक विद्यार्थ्यांची बाचाबाचीही झाली होती. नंतर 100 पैकी 43 विद्यार्थी बेपत्ता झाले होते. या विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांना ड्रग गँगच्या हवाली करण्यात आले आहे. तसेच सगळ्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.
माजी नगराध्यक्ष जोस आणि त्याच्या पत्नीला अटक झाल्यानंतर महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता आहे. असल्याचे बेपत्ता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वकीलाने म्हटले आहे.
चौकशी सुरु असताना पोलिसांना एक सामूहिक कबर आढळून आली आहे. त्यात 38 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, सापडलेले मृतदेह बेपत्ता विद्यार्थ्यांचे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यत 56 संशयिताना ताब्यात घेतले आहे.