आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iran Threaten America, If Attacked On Syria, Then Result Not Good

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराणची अमेरिकेला धमकी,सिरियावर हल्ला केल्यास होतील गंभीर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान,/वॉशिंग्टन/ दमास्कस - सिरियातील रासायनिक हल्ल्याची संयुक्त राष्ट्रामार्फत चौकशी करण्यासाठी अमेरिकेसह पाश्चात्त्य राष्ट्रांकडून सिरियन सरकारवर दबाव वाढत आहे. अमेरिकेने लष्करी कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असताना सिरियाचा मित्र इराणने थेट अमेरिकेला धमकी दिली. सिरियावर लष्करी कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा खणखणीत इशारा इराणने दिला आहे.


रासायनिक हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लष्कराला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या तसेच अमेरिकेने शनिवारी आपली युद्धनौका भूमध्य सागराकडे रवाना केली आहे. या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिक ा, इस्रायल व पाश्चात्त्य राष्ट्रांना हा इशारा दिला आहे. अमेरिकेने ‘लाल रेषा’ ओलांडल्यास त्याचे गंभीर परिणाम व्हाइट हाऊसला भोगावे लागतील, अशा शब्दांत इराणी लष्कराचे उपप्रमुख मसूद जझायेरी यांनी म्हटले आहे. सिरियातील दहशतवाद हा अमेरिका, इस्रायल व पाश्चात्त्य देशांचा कट आहे. त्याला असद सरकार आणि सिरियन जनतेने चोख उत्तर देऊन यश मिळवले आहे. मात्र, या आगीत तेल ओतणारे सुटणार नाहीत. जनता त्यांचा सूड घेईल, असे जझायेरी म्हणाले. सिरियातील गृहयुद्धात रासायनिक हल्ला म्हणजे लाल रेषा ओलांडल्यासारखे आहे.


त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे वक्तव्य गतवर्षी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते.


रासायनिक हल्ला केला कुणी ?
सरलेल्या बुधवारी सिरियाची राजधानी दमास्कसनजीक रासायनिक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 355 लोक ठार झाले, असे आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या गटाचे (एमएसएफ ) म्हणणे आहे. मात्र, सिरियातील बंडखोर राष्ट्रीय आघाडीच्या मते 1300 नागरिक ठार झाले होते. या हल्ल्याचे खापर बंडखोरांनी असाद सरकारवर फोडले आहे, तर असाद सरकारने बंडखोरांवर ठपका ठेवला आहे.


ओबामा-कॅमेरून 40 मिनिटे चर्चा
ओबामा यांनी शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी सुमारे 40 मिनिटे फोनवर चर्चा केली. रासायनिक हल्ल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने योग्य ते प्रत्युत्तर दिले पाहिजे, या मुद्द्यावर उभय नेत्यांचे एकमत झाले, असे ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. त्यामुळेच अमेरिका सिरियात लष्करी हस्तक्षेप करू शकते, असे संकेत मिळाले आहेत.


चौकशीसाठी
सिरिया तयार

संयुक्त राष्ट्राकडून होणा-या चौकशीस सामोरे जाण्यास सिरियाने तयारी दर्शवली आहे.संयुक्त राष्ट्राचे पाहणी पथक सध्या सिरिया दौ-यावर आहे. या पथकास सहकार्य करण्यास असाद सरकार तयार असल्याचे इराणचे परराष्‍ट्रमंत्री मोहंमद जवाद झरीफ यांनी सांगितले. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. संयुक्त राष्ट्राच्या नि:शस्त्रीकरण व्यवहार विभागाच्या प्रतिनिधी अँगेला केन यांच्याकडे चौकशीच्या अटी-शर्ती ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, रासायनिक हल्ल्याचा शास्त्रीय पुरावा नसल्याचे आंतरराष्‍ट्रीय डॉक्टर्सच्या गटाचे म्हणणे आहे.


इस्रायलची धमकी
सिरियाचा शेजारी इस्रायलनेही गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. जनतेच्या संरक्षणासाठी इस्रायल ‘ट्रीगर’ ओढू शकतो असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दिला. फ्रान्सचे राष्‍ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ ओलांद यांनीही रासायनिक हल्ल्यास सिरियन सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


शत्रूचा शत्रू तो आपला मित्र : सिरिया-इराण मैत्री
इराण आणि सिरिया ही दोन्ही राष्ट्रे शियाबहुल आहेत. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद हे शिया पंथातील अलवाईट समुदायाचे आहेत. सिरिया हे धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र समजले जाते, तर इराण हे इस्लामी राष्‍ट्र आहे. परंतु 80 च्या दशकात इराण-इराक युद्धात सिरिया इराणच्या बाजूने उभा होता. अरब देशांच्या विरोधात जाऊन सिरियाने त्या वेळी इराणला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून दोन्ही देशांची मैत्री आहे. दोघांचाही प्रमुख शत्रू इस्रायल असून लेबनॉनमधील शिया संघटना हिज्बुल्लास सिरिया व इराण शस्त्रपुरवठा करतात. हिज्बुल्ला संघटना पॅलेस्टाइनमध्ये इस्रायलविरोधात काम करते.