आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणची करारासाठी तयारी; वाटाघाटीसाठी सहा देशांची सहमती, अंतिम मसुदा पुढील महिन्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएन्ना - आण्विक कार्यक्रमावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी इराणची सहा देशांसोबत नव्या चर्चेला मंगळवारी सुरुवात झाली. बैठकीत वार्ताकारांनी दीर्घकालीन करार करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु कराराची तयारी दर्शवणार्‍या इराणशी अनेक मुद्दय़ांवर मतभेद असल्याने मसुदा तयार करण्याचे आव्हान सहा देशांसमोर असेल.
युरेनियमप्रश्नी इराणला देण्यात आलेल्या डेडलाइनची मुदत संपण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवकाश आहे. ही मुदत संपण्याअगोदरच इराणकडून पुढील चर्चेसाठी अनुकूलता दर्शवण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बैठकीला सुरुवात झाली आहे. बुधवारीदेखील त्यावर चर्चा होईल. करार तयार करण्यासंबंधी सर्व देशांनी सहमती दाखवली आहे, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री मोहंमद जावेद झारिफ यांनी पत्रकारांना दिली. त्या अगोदर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाटाघाटीसंबंधी चर्चेच्या काही फेर्‍या झाल्या होत्या. ती चर्चेच्या दृष्टीने पूर्वतयारी ठरली; परंतु खरी आव्हाने पुढेच आहेत, असे झारिफ यांनी सांगितले. ते सरकारी टीव्ही वाहिनीशी बोलत होते. बैठकीत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, र्जमनी, रशिया, चीन या देशांचे मुत्सद्दी सहभागी झाले होते.
तरीही आव्हाने
करार पूर्ण झाल्यास इराणवरील निर्बंध मागे घेण्यात येतील, असे आश्वासन सहा महासत्तांनी इराणला दिले आहे; परंतु नागरी वापरासाठी युरेनियमची गरज आहे, यावर इराण ठाम आहे. त्यामुळे युरेनियमसह अन्य काही मुद्दय़ांवर इराणशी जुळवून घेताना सहा देशांच्या मुत्सद्दय़ांचा कस लागणार आहे. मसुदा तयार करण्याचे हे आव्हान मानले जाते.
नोव्हेंबरमधील करार काय?
नोव्हेंबरमध्ये झालेल्या करारानुसार इराणच्या आण्विक कार्यक्रमासंबंधीच्या विशिष्ट बाबींवर बंदी घालण्यात आली होती. त्याचा कालावधी सहा महिन्यांसाठी आहे. जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मेमध्ये अंतिम मसुदा अपेक्षित
व्हिएन्नातील दोनदिवसीय बैठकीत सर्व मुद्दय़ांचा आढावा घेण्यात येईल; परंतु त्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार होईल. त्या वेळी दोन्ही बाजूंनी तडजोडी झाल्यानंतर मसुदा अंतिम स्वरूप घेऊ शकेल, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोठी कपात करा!
इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी महत्त्वाची कपात करणे गरजेचे आहे. अर्थात, आण्विक हत्यारे तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या निर्मितीला र्मयादा घातली गेली, तर अण्वस्त्राचा धोका टळू शकेल, असे मत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, र्जमनी यांनी व्यक्त केले. त्यासाठी दक्षिण तेहरानमध्ये असलेल्या फोर्डाे येथील युरेनियम प्रकल्पाला बंद करण्याची मागणीही प्रगत राष्ट्रांकडून करण्यात आली. त्यावर चार देशांनी सहमती दर्शवली. रशिया, चीनने मात्र तटस्थता दाखवली.
छायाचित्र - व्हिएन्ना, मंगळवारी बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत सहभागी युरोपियन संघटनेच्या परराष्ट्र धोरण प्रमुख कॅथरिन अँश्टन व इराणचे परराष्ट्र मंत्री मोहंमद झारिफ.