आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IS Terrorist Organization Want Nuclear Weapons For Expansion, Divya Marathi

\'आयएस\' दहशतवादी संघटनेचा व्याप्ती वाढीकरिता आण्विक अस्त्रांवर डोळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: इराक व सिरियाचा काही भूभाग बळकावून इस्लामिक स्टेटची घोषणा करणा-या 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा आपली व्याप्ती वाढवण्यासाठी आता आण्विक अस्त्रांवर डोळा आहे.
लंडन - इराक व सिरियाचा काही भूभाग बळकावून इस्लामिक स्टेटची घोषणा करणा-या 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा आपली व्याप्ती वाढवण्यासाठी आता आण्विक अस्त्रांवर डोळा आहे. यासाठी इराणमधून आण्विक गुपिते चोरण्याचा आयएसचा डाव नुकताच उघडकीस आला आहे. नाझी राजवटीसारख्या क्रूरतेने एकएक प्रदेश पादाक्रांत करण्याचा आयएसचा डाव असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

इराकी फौजांनी जप्त केलेल्या आयएसच्या एका दस्तातून हे स्पष्ट होत आहे. यात संघटनेचा आगामी काळातील जाहीरनामा मांडण्यात आला आहे. त्यानुसार इराणमधून आण्विक गुपिते चोरण्याची संघटनेची महत्त्वाकांक्षा असून आपल्या सदस्यांना यासाठी आयएसने आवाहन केले आहे. आयएसच्या या लढाईची रुपरेषा ठरवणा-या व अत्यंत गुप्त राहणा-या सहा म्होरक्यांपैकी अब्दुल्ला अहमद अल-मेशेदानी याने हा जाहीरनामा लिहिला आहे. जाळीदार कागदांवर हा जाहीनामा टंकलिखित करण्यात आला असून गेल्या मार्चमध्ये इराकच्या विशेष पथकाने आयएस सदस्याच्या घरातून तो जप्त केला होता.

कट्टरवाद, क्रूरतेचा उल्लेख
आयएसच्या या जाहीरनाम्यात ७० विविध योजना नमूद असून स्वयंघोषित इस्लामिक खिलाफतची व्याप्ती वाढवण्यासाठी वाटेल त्या क्रौर्याची तयारी असल्याचे यात मेशेदानी याने स्पष्ट केले आहे.

रशियाची मदत घेण्याचा संकल्प
* मेशेदानी जाहीरनाम्यात म्हणतो, इराणच्या अण्वस्त्रांवर ताबा मिळवणे हे आयएसचे लक्ष्य आहे. यासाठी रशियाची मदत घेतली जाईल. त्या बदल्यात रशियाला आयएसच्या ताब्यातील तेलविहिरी दिल्या जातील.
* इराकच्या अनबर प्रांतात आयएसच्या ताब्यात असलेल्या नैसर्गिक वायूच्या खदाणी रशियाकडे सोपवल्या जातील.
* तेल आणि गॅसच्या मोबदल्यात आयएसने मिळवलेल्या अण्वस्त्रांचा आणि त्यासंबंधीच्या तंत्रज्ञानाचा नाद रशियाने सोडावा लागेल.
* सिरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना पाठिंबा देणे रशियाने थांबवावे लागेल.
* इराणविरुद्ध इतर आखाती देशांना रशियाने पाठबळ द्यावे, असे यात नमूद आहे.
मेशेदानी आहे कोण?
>आयएसच्या भात्यातील सर्वांत कट्टरवादी मानवी शस्त्र.
> शियाबहुल इराणचे विभाजन हे त्याचे लक्ष्य.
> इराणमधून शियांचे उच्चाटन करण्याचे ध्येय.
>इराकचे प्रमुख लष्करी अधिकारी, शिया अधिकारी आणि इराणच्या पाठिंब्यावर लढणारे शिया दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेला दहशतवादी.

क्रौर्याचा कळस
क्रूर विचारप्रणाली हा आयएसच्या स्थापनेचा पाया आहे. मेशेदानी याने जाहीरनाम्यात स्पष्ट नमूद केले आहे की, इप्सित ध्येय गाठण्यात आयएसचे कुणी दहशतवादी अपयशी ठरले तर या संघटनेचे गुप्तचर त्यांचा खात्मा करतील.

हिंदी महासागरात बेटे विकत घेतील
हिंदी महासागरात येमन आणि इतर देशांच्या ताब्यात असलेली काही बेटे विकत घेऊन त्यावर लष्करी तळ उभारण्याचा आयएसचा संकल्प आहे. यामुळे आगामी काळात भारतीय उपखंडाला प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो.

आयएसच्या मदतीला तालिबान
पाकमध्ये कार्यरत तालिबान या कट्टरवादी संघटनेनेही आयएसला मदत करण्याचे ठरवले आहे. आपले काही दहशतवादी या जिहादी गटाला पुरवण्याचा तालिबानचा मनसुबा आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा संस्थापक मुल्ला फजलुल्लाह याने शनिवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात आयएसला पाठिंबा दिला आहे. पाकच्या उत्तर वजिरिस्थानात कार्यरत या तालिबानी गटाला पाक लष्कराने जोरदार हादरे दिले.