आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IS Twitter Account Operative In Banglore, British News Chennel Disclose

कुख्यात 'आयएस'च्या टि्वटर अकाउंटचा चालक बंगळुरूत, ब्रिटिश वृत्तवाहिनीने केला पर्दाफाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू/ नवी दिल्ली - इराक-सिरियामध्ये उच्छाद मांडणा-या इस्लामिक स्टेटचे टि्वटर अकाउंट भारतात बंगळुरूतून ऑपरेट केले जात होते. 'चॅनल ४' या ब्रिटिश वृत्तवाहिनीने हा दावा केल्याने प्रचंड खळबळ माजली असून आयएसचे हे टि्वटर अकाउंट "शमी विटनेस' नावाने एक भारतीय चालवत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

हे वृत्त प्रसिद्ध होताच भारतीय प्रशासन व पोलिस यंत्रणेत खळबळ माजली असून चॅनल-४ नुसार जो युवक हे अकाउंट चालवत आहे तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीस आहे. बंगळुरू पोलिसांनी याची गंभीर दखल घेत जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, हे टि्वटर अकाउंट शुक्रवारी बंद झाले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. "शमी विटनेस'
या टि्वटर अकाउंटचे १७ हजार ७०० फॉलोअर्स होते, असे संबंधित वाहिनीने म्हटले आहे. महिन्याला सुमारे २० लाख लोक या अकाउंटला भेट देत असल्याची माहितीही समोर येत आहे.

असे चालले आयएसचे अकाउंट
-गेल्या वर्षी सुरू झालेल्या अकाउंटद्वारे सिरियातील सैनिकांच्या हत्येचा व्हिडिओ अपलोड.
-आयएसच्या आक्रमकतेचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. फ्रंटलाइनचे अपडेटही पोस्ट होते.
-ट्विटच्या साहाय्याने आयएसच्या दहशतवाद्यांचा उत्साह वाढवण्याचे काम. परस्पर माहितीची देवाणघेवाण
-अमेरिकी नागरिक पीटर कासिगचे शिर कत्तल केल्याचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता.

वॉलवर माहिती
एक युवक मेहंदी या टोपणनावाने आयएसचे टि्वटर अकाउंट चालवत होता. तो एका जाहिरात कंपनीत नोकरीस आहे. जगभरात विविध दहशतवादी संघटना तसेच गटांशी संबंधित लोक हे अकाउंट फॉलो करत होते. या वॉलवर रोज आयएससंबंधी माहिती तसेच संघटनेचा उद्देश आणि जगभर संघटनेला मिळत असलेला प्रतिसाद याची माहिती प्रसिद्ध केली जात होती.

अकाउंट बंद, ब्लॉग सुरू
संबंधित युवक मोबाइलवरूनच हे अकाउंट चालवत होता. चॅनल-४ ने या युवकाशी संपर्क साधल्यानंतर त्याने ही माहिती दिली. मेहंदीचे टि्वटर अकाउंट बंद झाले आहे. परंतु त्याच्याशी संबंधित ब्लॉगपोस्ट अद्याप बंद झालेले नाहीत. त्याच्यावर गेल्या वर्षी जूनमध्ये शेवटचे पोस्ट झालेले दिसते. त्यात जिहादी गटांतील आपसातील चर्चा होती. आयएसच्या कारवाया सुरू करण्यासंबंधीचे काही संभाषण व्हिडिओत होते.

तपास सीबीआयकडे
बंगळुरू पोलिस आयुक्त एम.एन. रेड्डी म्हणाले, ब्रिटिश वाहिनीच्या दाव्याचा तपास करण्याची जबाबदारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. ही व्यक्ती बहुदा शहरातून बाहेर गेली असावा. सायबर सेल तिच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे ब्रिटिश वाहिनीने मेहंदीशी संपर्क साधला होता. संधी मिळाल्यास आपण सर्व गोष्टी सोडून आयएसच्या कारवायात सहभागी होऊ. तशी आपली तयारी आहे. सध्या कुटुंबाला माझी गरज आहे. त्यामुळे शहर सोडता येत नाही. माझे नाव जाहीर करू नका, अशी विनंती या तरुणाने ब्रिटिश वाहिनीला केली होती.