बगदाद -
इराकमध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दात आयएसआयएसच्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला.मृत भारतीयाचे नाव राजेश कुमार असे आहे. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील बरौचमध्ये राहणारे 38 वर्षाच्या कुमार जेव्हा तिकरितहून बगदादकडे जात होते तेव्हा दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
इराकमध्ये राजेश गवंडी काम करत असे. तो 6 मे रोजी गालिब अली नावाच्या दलालच्या माध्यमातून इराकमध्ये गेला होता. आपल्या 4 मुली प्रियांशु, लाडो, अन्नू आणि अंकिता यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी राजेश इराकमध्ये गेला होता, असे त्याचे वडील जगदीश यांनी इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली.
शनिवारी ( ता. पाच) अली नावाच्या मित्राने दिल्लीतून राजेशला फोन केला होता तेव्हा त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली,असे कुटूंबातील सदस्यांनी म्हटले. मृत्यूची वार्ता ऐकताच पत्नी साधना बेशुध्द झाली. राजेशची आई मीरादेवी आणि भाऊ दिनेश यांनाही मोठा धक्का बसला होता. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. राजेशचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील असे, जिल्हा न्यायदंडाधिकारी नरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले.