रक्का - सिरियामध्ये आयएसआयएसने परदेशातून आलेल्या 100 दहशतवाद्यांची हत्या केली आहे. हे सर्व ISIS सोडून पळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार सिरियाच्या रक्का शहरात ही घटना घडली आहे.
ISIS मध्ये सहभागी झालेल्या अनेक परदेशी नागरिकांच्या हाती निराशा आल्याने त्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे. पण ISIS त्यांना तसे करू देत नसल्याचे समोर आले आहे. बोलण्याचेही स्वातंत्र्य नसल्याने या सर्वांमध्ये निराशेचे वातावरण वाढत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. तसेच त्यांच्याकडून नको ती कामे करून घेतली जात आहेत. दरम्यान, रक्काच्या स्थानिक नागरिकांतही ISIS बद्दल असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्यातही युरोपीय देशांमधून आलेल्या 12 जणांनी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यानंतर त्यांना ISIS ने बंदी बनवले. ISIS साठी लढणा-या जिहादींची अशी तक्रार आहे की, सिरियामध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरुद्ध लढण्याऐवजी त्यांना स्थानिक विद्रोही गटांशी लढावे लागत आहे. ISIS मध्ये सहभागी झालेल्या एका ब्रिटीश दहशतवाद्याने सांगितले की, लंडनच्या किंग्स कॉलेजच्या International Center for the Study of Radicalization च्या संथोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या आणखी अशाच 30 ते 50 जिहादींनाही परतण्याची इच्छा होती. पण त्यांनाही मारण्यात आले.
ड्युटीवर न येणा-यांवर कारवाई
ISIS ने नुकतीच एक मिलिट्री पोलिस स्थापन केली आहे. ते ड्युटीवर न येणा-यांवर कारवाई करतात. ISIS पोलिसांनी रक्कामध्ये 400 अशाच सदस्यांना अटक केली आहे. नवीन नियम तयार केल्यानंतर त्यांनी त्यांच्या म्होरक्यांना 48 तासांच्या आत रिपोर्ट केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवीन नियमानुसार दहशतवाद्यांना आता ते ISIS चे सदस्य असल्याचे कागदोपत्री पुरावे सोबत ठेवावे लागतील. त्यांना कोणत्या मिशनसाठी तैनात करण्यात आले आहे, हेही याच कागदपत्रांवरून समजणे गरजेचे आहे.