आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Terrorist Edges Near Jordan, John Kerry Meets Maliki

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सद्दामला फाशी देणार्‍या जजला गोळी घातली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - आयएसआयएसच्या सुन्नी दहशतवाद्यांनी इराकचा पदच्युत हुकूमशहा सद्दाम हुसैनला फाशीची शिक्षा ठोठावणार्‍या न्यायाधीशाला गोळी घालून ठार केले. इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैनला 2006 मध्ये पदावरून पायउतार करण्यात आले होते.

न्यायाधीश रऊफ अब्दुल रहेमान यांचे दहशतवाद्यांनी 16 जून रोजी अपहरण केले होते. दहशतवाद्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी न्यायाधीशांनी नर्तकाचे कपडे घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होते. न्यायाधीश कुर्द होते. सद्दाम हुसैनच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी रऊफ यांची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बैजी शहरावर मंगळवारी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात 32 जण ठार झाले. मृतांमध्ये परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी झालेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले हे स्पष्ट नाही. बैजी शहरात पहिला हवाई हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री सरकारी फौजांनी दहशतवाद्यांचा पाडाव केला. दहशतवाद्यांची चढाई हाणून पाडण्यात लष्कराला यश मिळाले. दरम्यान, इराकमध्ये तैनात अमेरिकी सैनिकांना कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे.

महत्त्वाचा कारखाना
काही वर्षांपूर्वी बैजी येथील तेल कारखान्यातून देशातील पेट्रोलियम पदार्थांपैकी 50 टक्के उत्पादन केले जात होते. त्यामुळे या कारखान्याचे महत्त्व सहज लक्षात येऊ शकते. परंतु मंगळवारी परिसरात दहशतवाद्यांसोबतचा संघर्ष आणि प्रचंड गोळीबार पाहायला मिळाला.

पाच प्रांतांवर कब्जा
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट या सुन्नी दहशतवादी संघटनेने बगदादपासून 60 किलोमीटर अंतरावरील पाच प्रांतांवर कब्जा केला आहे. त्यांचा मुकाबला करताना मात्र सरकारी फौजा दुबळ्या पडल्याचे दिसून आले.

17 दिवसांत शेकडो ठार
जीनिव्हा - गेल्या 17 दिवसांमध्ये इराकमध्ये झालेल्या हिंसाचारात 1 हजारहून अधिक ठार झाले. उत्तर, पश्चिम इराकमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात 1 हजार 75 जण ठार झाले, असे संयुक्त राष्ट्राकडून जाहीर करण्यात आले. त्यात 757 नागरिक ठार, तर 599 जण जखमी झाले. बगदादमध्ये 590 नागरिक जखमी झाले.

केरींची कुर्दिश राज्याला भेट
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी बगदादमध्ये इराकी नेत्यांची भेट घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी स्वायत्त कुर्दिश राज्याला भेट देण्याची जाहीर केले. कुर्द समुदायाने केंद्र सरकारला सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

17 भारतीयांची सुटका
नवी दिल्ली - इराकमधील हिंसाचारग्रस्त भागात अडकलेल्या 17 भारतीयांची स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुटका करण्यात आली. भारतासाठी देशातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य असल्याचा पुनरुच्चर परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. आता सोडवण्यात आलेल्या एकूण भारतीयांची संख्या 39 झाली आहे.

छायाचित्र : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी मंगळवारी इर्बिलला अचानक भेट देऊन कुर्दिश राष्ट्राध्यक्ष मसूद बार्झानी यांच्याशी चर्चा केली.