कोबेन - सिरियामध्ये तुर्कस्तानच्या सीमेनजीक इस्लामिक स्टेट (आयएस) अतिरेक्यांच्या तळावर अमेरिकेने नव्याने हवाई हल्ले चढवले. कुर्दबहुल कोबेन शहराच्या आसपास हवाई हल्ले केले जात असल्याचे सिरियातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आयएस अतिरेक्यांनी कोबेनची गेल्या दिवसांत नाकेबंदी केली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लष्करी विमाने तुर्कस्तानच्या दिशेने जात असल्याचे सांगितले. मात्र, तुर्कस्तानच्या अधिका-यांनी हल्ल्यासाठी
आपल्या हवाई सीमेचा वापर करू देण्यास नकार दर्शवला आहे. अमेरिका आघाडीने सोमवारपासून सिरियातील आयएसविरोधात हवाई हल्ले चढवले आहेत. मुख्य तळांवर हल्ला : अमेरिकेने सोमवारी पहिल्यांदा सिरियातील इस्लामिक स्टेटच्या तळांवर निशाणा साधला. या हल्ल्यात जवळपास ७० कट्टरपंथी तर अल कायदाशी संबंधित ५० अतिरेकी मारले गेले आहेत. या व्यतिरिक्त या हल्ल्यात आठ नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.
हवाई हल्ल्यास दुजोरा नाही
अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांनी कोबेनजवळ हवाई हल्ले झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला नाही. अमेरिका सेंट्रल कमांडने मंगळवारी रात्री सिरियाच्या देइर अल जोरमध्ये आणखी दोन हवाई हल्ले केल्याचा दुजोरा दिला आहे. आयएसने सिरिया व
इराकच्या सर्वात मोठ्या भागावर कब्जा केला आहे. अमेरिकेने ऑगस्टनंतर
इराकमध्ये साधारण २०० हवाई हल्ले केले आहेत.
आयएसविरुद्ध अनेक वर्षे युद्ध
कट्टरपंथीय संघटना इस्लामिक स्टेटविरोधात (आयएस) पुकारलेले युद्ध अनेक वर्षे चालू शकते, असे अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. सिरियातील हवाई हल्ल्यात आयएसचे बरेच नुकसान झाले आहे. या युद्धात अमेरिकेला ५० देश मदत करण्यास तयार असल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी म्हणाले.