आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसची अधिका-यांना जिवे मारण्याची धमकी, ट्विटरचे सीईओ डिक कोस्तोला यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनफ्रान्सिस्को - इस्लामिक स्टेट (आयएस) च्या अतिरेक्यांनी ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळाच्या कर्मचा-यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली ट्विटरचे सीईओ डिक कोस्तोलो यांनी दिली आहे.आयएस सदस्यांचे ट्विटरवरील अकाउंट हटवणे सुरू केल्यानंतर त्यांच्याकडून धमक्या मिळायला लागल्या. या धमक्या ट्विटरवरूनच देण्यात आल्या. अशा परिस्थितीशी लढा देणे कठीण आहे आणि या विषयावर मी कंपनी व्यवस्थापनाशी प्रदीर्घ चर्चा केल्याचे कोस्तोलो यांनी म्हटले आहे.

सॅनफ्रान्सिस्कोमध्ये आयोजित ‘व्हॅनिटी फेअर न्यू एस्टॅब्लिशमेंट समीट’मध्ये त्यांनी ही स्वीकृती दिली आहे. ते पुढे म्हणाले, आपला संदेश वेगाने पोहोचवण्यासाठी तसेच पसरवण्यासाठी आयएसने ट्विटरचा प्रभावीपणे वापर केला होता. त्यामुळे ट्विटरने अशा खात्यांना नियमबाह्य ठरवत बंद करून टाकले होते.

ब्रिटिश राजधानी लंडनच्या रस्त्यांवर हजारो संशयित दहशतवादी फिरत असल्याचा दावा लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यांनी केला आहे. बहुतांश संशयितांवर सुरक्षा यंत्रणेची नजर असून नुकतेच एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याला अयशस्वी करण्यात आल्याचेही जॉन्सन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, लंडनच्या पोलिसप्रमुखांनी सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिल्यानंतर महापौरांनी हा इशारा दिला आहे. जॉन्सन पुढे म्हणाले की, ब्रिटनचे सुमारे ५०० नागरिक इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी सिरियामध्ये गेले आहेत. जॉन्सन यांनी विन्स्टन चर्चिल यांच्या आत्मचरित्राचे लेखन केले आहे.

उपपंतप्रधानांच्या पत्नीची सुटका
याउंदेमधून मिळालेल्या माहितीनुसार, बोकोहरमच्या दहशतवाद्यांनी २७ अपहृतांची सुटका केली आहे. यात कॅमरूनचे उपपंतप्रधान अमादाऊ अली यांची पत्नी आिण चीनच्या १० नागरिकांचाही समावेश आहे. मे ते जुलै या कालावधीत त्यांचे अपहरण करण्यात आले होते. सुटका झालेल्या नागरिकांना शनिवारी उत्तर प्रांतातून राजधानीत आणण्यात आल्याचे कॅमरूनचे राष्ट्रपती पॉल बिया यांनी सांगितले. बोकोहरम ही संघटना आफ्रिकेत इस्लामी राज्य कायम करण्यासाठी लढाई करत आहे.

तावडीतून सुटका
पाकिस्तानच्या तालिबानमध्ये अपहरण करण्यात आलेल्या जर्मनीच्या एका नागरिकाची सुटका करून आणल्याची माहिती जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. बेरंड एम नामक या नागरिकाचे तालिबान्यांनी दोन वर्षांपूर्वी अपहरण केले होते.

इराकच्या टीव्ही पत्रकाराची हत्या
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सलाहुद्दीन या वाहिनीच्या एका पत्रकाराची शुक्रवारी तिक्रितमध्ये हत्या केली. राद अल अज्जावी नामक या पत्रकाराचे दहशतवाद्यांनी ७ सप्टेंबर रोजी अपहरण केले होते.सलाहुद्दीन प्रांताचे राज्यपाल राद इब्राहिम आणि रिपोर्टस विदाऊट बॉर्डर्सने अल अज्जावी यांच्या हत्येची माहिती दिली.