आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलचा सिरियावर हल्ला; दमास्कस, लेबनॉन सीमेजवळ बॉम्बवर्षाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - इस्रायलने सिरियाच्या दमास्कस भागात रविवारी रात्री उशिरा हवाई हल्ले चढवले. सिरिया आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, इस्रायलकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तसेच शहराच्या बाह्यवस्तीत लेबनॉन सीमेजवळ बॉम्बवर्षाव केला.

हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सरकारी वृत्तवाहिनी अल इखबारियाच्या वृत्तात म्हटले आहे. इस्रायलने दमास्कसच्या शांततापूर्ण भागावर हल्ला चढवनू घृणास्पद कृत्य केले आहे. इस्रायल अतिरेकी गटांना पाठिंबा देत असल्याचे उघड झाले आहे.
सिरियन लष्कराच्या हल्ल्यात बंडखोरांचे नुकसान भरून काढण्याचा इस्रायल प्रयत्न करत असल्याचा आरोप सिरियाचे परराष्ट्रमंत्री वालिद अल-मोआल्लम यांनी केला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांच्यासोबत तेहरानमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत वालिद यांनी हा आरोप केला.

अतिरेक्यांना शस्त्र नाही : इस्रायल
अतिरेकी गटांच्या हातात शस्त्र पडू न देण्याचे इस्रायलचे धोरण असल्याचे त्या देशाने सोमवारी सांगितले. गुप्तचर विभागाचे मंत्री येवल स्टेनित्झ यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अतिरेकी गटांकडे शस्त्रे जाऊ नयेत हे आमचे धोरण कायम असल्याचे स्टेनित्झ यांनी स्पष्ट केले. इस्रायलने वर्षभरात सिरियाच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला आहे.

निर्वासितांना सामावून घेण्याचे आवाहन
सिरिया संघर्षामुळे निर्वासित झालेल्या १ लाख ८० हजार नागरिकांना विविध देशांनी सामावून घेण्यासाठी जगभरातील ३० मानवतावादी संघटनांनी मोहीम उघडली आहे. ही संख्या २०१५ अखेरीस निर्वासितांच्या प्रस्तावित आकड्याच्या पाच टक्के आहे. मंगळवारी होणा-या परिषदेमध्ये या विषयावर चर्चा केली जाईल. तीन वर्षांच्या लढाईत साधारण ३२ लाख नागरिक शेजारच्या देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. २०१५ अखेरीस ही संख्या ३६ लाखांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. विविध देशांनी १ लाख ८० हजार निर्वासितांना मदत पॅकेज आर्थिक आधार द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.