टोकियोहून -जपानी उद्योजकांनो, माझ्यापेक्षा भारतीय उद्योजकांना नीट पाहा. कारण एकवेळ मला भेटणे सोपे जाईल, पण माझ्या उद्योजकांना भेटण्यासाठी मलादेखील २० दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आणि दुभाषकाने त्याचा अर्थ सांगताच जपानी उद्योजकांनी भारतीय उद्योजकांना स्टँडिंग ओव्हेशन (उभे राहून अभिवादन) दिले.
जपानमधील सकाळी दहाची वेळ. टोकियोत आलिशान सभागृहात भारतातील २० अग्रणी उद्योजक व जपानमधील कईडारेन या उद्योजक संघटनेचे पदाधिकारी मोदींची वाट पाहत होते. खादीचा पिवळा नेहरू शर्ट व खांद्यावर भारतीय धाटणीचे उपरणे घेऊन मोदींचे आगमन झाले. त्यांना पाहताच सर्व उद्योजकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आम्ही दोघे मराठवाड्यातील उद्योजक हा सोहळा पाहून भारावून गेलो. पंतप्रधानांनी परदेशात भारतीय उद्योजकांना स्वत:पेक्षा मोठे स्थान दिल्याने आम्हा उद्योजकांचा ऊर भरून आला आणि अनेकांचे डोळे पाणावले.
मोदींनी सव्वा तास उद्योजकांसमोर आपले विचार ओघवत्या हिंदीतून मांडले. मोदींची संवादशैली व देहबोलीच सारे काही सांगून जात होती. मोदी म्हणाले, माझ्या देशाची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला कौशल्य विकासाची गरज आहे. तुमचा देश तंत्रज्ञानात पुढे आहे. माझ्या देशासाठी तुमची मदत घ्यायची आहे. म्हणून तुम्ही माझ्या देशात बुलेट ट्रेनचे जाळे व अणु ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी या. त्यासाठी भारत सरकार तुमच्या पाठीशी राहील, असे आवाहनही त्यांनी केले. जपानी उद्योजकांनी टाळ्यांचा कडकडाट करत या आवाहनाला जणू होकारच दिला.
बाबा कल्याणींनी केले प्रतिनिधित्व ..
भारतातील २० उद्योजक या दौऱ्यात आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व बाबा कल्याणी यांनी केले. यात आनंद महिन्द्रा, अझीम प्रेमजी, चंदा कोचर यांच्यासह दिग्गज उद्योजकांचा समावेश आहे. केडरेन या जपानी उद्योजक संघटनेसोबत बुलेट ट्रेनसह इतर करार करण्यात आले. या कार्यक्रमानंतर मोदींनी उद्योजकांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला.
जपानी बुलेट ट्रेनला ५० वर्षे
जपानी बुलेट ट्रेनला नुकतीच ५० वर्षे झाल्याचे आम्हाला कळले. तेथील दूतावासाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ५० वर्षांत एकही अपघात बुलेट ट्रेनचा झाला नसून कोणीही दगावले अथवा जखमी झालेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये, मुलांमध्ये ‘कान्हा’ मोदी