टोकियो - २०११ मधील फुकुशिमा
आपत्तीनंतर पहिल्यांदाच दक्षिण जपानमध्ये अणुऊर्जा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. फुकुशिमा अपघातानंतर अणु प्रकल्पाच्या सुरक्षा अटी कडक करण्यात आल्या होत्या. या सर्व अटींची पूर्तता करण्यास पात्र असल्याने नव्या सेंदाई अणुऊर्जा प्रकल्पास अणु नियंत्रक मंडळाने मान्यता दिली आहे.
त्सुनामी, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींचा तडाखा फुकुशिमाच्या दाई-इची प्रकल्पाला २०११ मध्ये बसला होता. नव्या प्रकल्पाच्या सुरक्षा यंत्रणांची तब्बल ३० दिवस पाहणी करण्यात आली.
यासाठी नागरिकांचे व तज्ज्ञांचेही मत घेण्यात आले. या दीर्घ चर्चेनंतरच जपान सरकारने सेंदाई प्रकल्प सुरू करण्यास मान्यता दिली आहे. फुकुशिमा शोकांतिकेनंतर जपानमधील इतर ४८ अणुऊर्जा प्रकल्प अद्यापही बंदच ठेवण्यात आले आहेत.