बीजिंग- भारतात बुलेट ट्रेन चालवण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्यास जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी नरेंद्र मोदी यांना हमी दिली आहे. परंतु दुसरीकडे मोदींचा जपान दौरा चीनला जिव्हारी लागला आहे. भारत आणि चीन यांच्यातील चांगल्या संबंधात जपान मोठी दरी निर्माण करत असल्याचे चीनने म्हटले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच दिवशीय जपान दौर्यावर आहेत. मोदींच्या जपान दौर्याबाबत चीनमधील 'ग्लोबल टाइम्स'मध्ये एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. चीन-भारतामधील संबंध वृद्धीगत होत असताना नरेंद्र मोदी यांचा जपान दौर्यामुळे त्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनने भारताला राजकीय सहकार्य करण्यासाठी ऎतिहासिक पाऊल उचलले आहे. परंतु,चीन आणि भारत या दोन्ही देशांमधील सुधारणारी सागरी रणनीती, आंतरराष्ट्रीय समन्वय तसेच राजकीय संसाधन, माध्यम आणि अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ग्लोबल टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे चीन आणि भारतातील परस्पर संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप या लेखातून करण्यात आला आहे.
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाद्वारा 'ग्लोबल टाइम्स' हे वृत्तपत्र चालवले जाते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्याच्या पार्श्वभूमीवर एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारत दौर्यावर गेले असताना भारताला आर्थिक साहाय्य करणार असल्याचे म्हटले होते. आबे यांनी भारताला 210 अब्ज येन (2.02 अब्ज डॉलर्स) अर्थ साहाय्य वाढवूनही दिले आहे.
भारत ही मोठी बाजारपेठ आहे, म्हणूनच जपानची ही उठाठेव सुरु असल्याचे चीनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ टिकवून ठेवण्यासाठी जपान भारताला आर्थिक मदतीचे प्रलोभन दाखवत असल्याचेही या लेखात म्हटले आहे.