आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो/नवी दिल्ली- बोईंग कंपनीच्या अद्ययावत 787 ड्रिमलायनर विमानामध्ये दोष आढळल्यानंतर जपानच्या दोन विमान कंपन्यांनी या मालिकेतील सर्व विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबविले आहे. सुरक्षेतील त्रुटी आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने मात्र अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
जापानच्या ऑल निप्पॉन एअरलाईन्सच्या एका विमानात बॅटरीने पेट घेतला. कॉकपीटमध्ये वैमानिकाच्या हे लक्षात येताच विमान तातडीने उतरविण्यात आले. अशाच प्रकारची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. त्यावेळी विमानाच्या मागील बाजुला असलेल्या बॅटरीने पेट घेतला होता. ऑल निप्पॉन एअरलाईन्सच्या ताफ्यात सर्वाधिक 17 ड्रिमलायनर विमाने आहेत. तर जपानच्याच जपान एअरलाईन्स या कंपनीकडे 7 विमाने आहेत. दोन्ही कंपन्यांनी ड्रिमलायनर विमानांची उड्डाणे थांबविली आहे. आग लागण्याचा प्रकार अतिशय धोकादायक असल्यामुळे विमानांची सखोल तपासणी होईपर्यंत एकही ड्रिमलायनर आकाशात झेपावणार नाही, असा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास आणि भारताच्या एअर इंडिया या सरकारी विमान वाहतूक कंपन्यांनी मात्र असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बोईंगचा अहवाल आल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.