Home »International »Pakistan» Jihad In Kashmir Against Afzal Guru Hanging

अफझलच्या फाशीनंतर काश्मिरात पुन्हा जिहाद

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 08:25 AM IST

  • अफझलच्या फाशीनंतर  काश्मिरात पुन्हा जिहाद

इस्लामाबाद - अफझल गुरूच्या फाशीनंतर पाकिस्तानातील दहशतवादी गट पुन्हा सक्रिय झाले आहेत. सन 1999 मध्ये कंदहार अपहरणकांडावेळी सोडण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी काश्मीरच्या आझादीसाठी ‘जिहाद’चा नारा दिला आहे.जम्मू-काश्मिरात पुन्हा दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा इरादा खतरनाक अतिरेकी मुश्ताक अहमद झरगर याने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे जैश-ए-महंमदनेही ‘जिहाद ’चा नारा दिला आहे.
मूळचा श्रीनगरचा रहिवासी असलेला झरगर ऊर्फ लटराम याने अल उमर मुजाहिदीन या नावाची दहशतवादी संघटना उभारली आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर,अहमद ओमर शेख यांची सुटका करण्यासाठी सन 1999 मध्ये आयसी-814 हे विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्या वेळी सोडण्यात आलेल्या चार अतिरेक्यांमध्ये झरगरही होता. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग हे चार अतिरेक्यांना घेऊन कंदहारला गेले होते. सुटका झाल्यापासून झरगर व्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादेतच मुक्कामी आहे.अफझल गुरूच्या फाशीनंतर तो पुन्हा सक्रिय झाला असून काश्मीरला आझादी मिळवण्यासाठी दहशतवाद हाच एक मार्ग आहे. सशस्त्र संघर्ष करून काश्मीरला आझाद करणे हाच मकसद असल्याचे तो एका मुलाखतीत म्हणाला. असे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज ने दिले आहे. झरगरप्रमाणेच जैश ए मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरनेही ‘ जिहाद’चा नारा दिला आहे. जम्मू-काश्मिरात कारवाया वाढवणार असल्याचे त्याने सांगितले.

कोण आहे झरगर
अत्यंत क्रूर समजला जाणारा झरगर सन 1984 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. माजी गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणात हात होता. सन 1989 मध्ये त्याने अल उमर मुजाहिदीन संघटना स्थापन केली. 1993 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. अखेर 1999 मध्ये कंदहारमध्ये त्याची सुटका झाली.

पाक सरकारचे कानावर हात
झरगरच्या वास्तव्याविषयी पाकिस्तानी सरकारने कानावर हात ठेवले. मात्र, तो मुझफ्फराबादेत मुक्कामी असल्याचे वृत्त ‘द न्यूज’ने दिले आहे.

शस्त्रे,पैशांची चिंता नाही
माणसे, शस्त्रे,पैसा याची चिंता नाही. ते कुठूनही मिळतात. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला अद्यापही दहशतवादी प्रशिक्षण तळ आहेत
मुश्ताक झरगर, अल उमर मुजाहिदीन ग्रुप


दहशतवाद्यांना भारताचे लेखी आश्वासन हवे
इस्लामाबाद । पाकिस्तानातील मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. चार भारतीय साक्षीदारांची उलटतपासणी करण्यास पाकिस्तानी आयोगाला मान्यता दिल्याचे लेखी आश्वासन भारताने द्यावे, अशी मागणी दहशतवादविरोधी न्यायालयाने केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 2 मार्च रोजी होणार असून त्या वेळी भारताचे लेखी पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात न्यायाधीश हबीब उर रेहमान यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. पाकिस्तानी आयोगाचा पहिला अहवाल त्यांनी फेटाळला होता. कारण यामध्ये भारतीय साक्षीदारांची उलटतपासणी करण्यात आली नव्हती. शनिवारी मुख्य सरकारी वकील चौधरी झुल्फिकार अली यांनी न्यायालयास सांगितले की हैदराबादेतील बॉम्बस्फोटामुळे पाकिस्तानी न्यायालयीन आयोगाचा भारत दौरा पुढे ढकलला जाऊ शकतो. उलटतपासणी संबंधी अद्याप भारताकडून उत्तर आलेले नाही. त्यानंतर रेहमान यांनी सुनावणी स्थगित केली. तत्पूर्वी, साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मुभा देणारे भारताचे लेखी पत्र न्यायालयात सादर करण्यात यावे, अशी मागणी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी झकी उर रेहमान याच्या वकिलाने केली होती.

Next Article

Recommended