आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंताओ पायउतार, जिनपिंग अध्यक्षपदी आरुढ होण्यास सज्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - जगाच्या नकाशावर चीनचा जागतिक सत्ता म्हणून उदय करणारे अध्यक्ष हू जिंताओ यांनी दशकभराच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर सत्तेची सूत्रे खाली ठेवली. त्यामुळे शी जिनपिंग या नव्या नेत्याचा जगातील दुस-या क्रमांकाच्या
सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अध्यक्ष जिंताओ यांच्या खांद्याला खांदा लावून गेली दहा वर्षे चीनची विकासाच्या दिशेने घोडदौड घडवून आणणारे पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनसीपी) 3,000 सदस्यांसमोर आपल्या कारकीर्दीतील उपलब्धींचा लांबलचक कार्यअहवाल सादर केला. 2011 मध्ये जपानला मागे टाकून चीनने जगातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून मिळवलेले स्थान त्यांनी अधोरेखित केले. वेन यांच्या 29 पानी अहवालात चीनमध्ये उभारण्यात आलेल्या पायाभूत सोयीसुविधांवर विशेष जोर देण्यात आला आहे. डझनभर विमानतळ, हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते, हायस्पीड रेल्वेबरोबरच जगातील दुस-या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या देशाच्या सर्वंकष विकासासाठी झालेल्या प्रयत्नांची जंत्री त्यांनी वाचून दाखवली.

दोन आठवडे चालणार
कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनमध्ये गटबाजीला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांच्या अध्यक्षतेखाली ‘खेळीमेळीच्या वातावरणात’ सत्तेच्या हस्तांतरासाठी नॅशनल पीपल्स काँग्रेसचे (एनसीपी) अधिवेशन मंगळवारी सुरू झाले. हे अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. या अधिवेशनात 59 वर्षीय शी यांची अध्यक्षपदी, 57 वर्षीय ली केकियांग यांची पंतप्रधानपदी आणि अन्य नेत्यांची औपचारिक निवड करण्यात येणार आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने ही नावे आधीच निश्चित केली आहेत.

आव्हानांचा पाढा
मावळते पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी आपल्या शेवटच्या भाषणात नव्या नेत्यांसमोरील आव्हानांचा पाढाच वाचला. भ्रष्टाचार, सत्तेचे अतिकेंद्रीकरण आणि राजकीय अखंडतेबरोबरच असंतुलित, असमन्वयित आणि अशाश्वत विकास या चीनसमोरील मोठ्या समस्या आहेत. गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढत चाललेली दरी, विकासाचा प्रादेशिक असमतोल, औद्योगिक विकास व पर्यावरण संरक्षणातील संघर्ष व संकटात सापडलेले आर्थिक क्षेत्र हे धोके त्यांनी सांगितले.