आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त यासिन मलिक परतीच्या मार्गावर; अटकेची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात 26-11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या मांडीला मांडी लावून बसणारा जेकेएलचा प्रमुख यासिन मलिक पुढील आठवड्यात भारतात परतणार आहे. भारतात परत येताच पासपोर्ट जप्तीची आणि अटके ची तयारी असल्याचे त्याने सांगितले.येत्या 9 मार्च रोजी पाकिस्तानी एअरलाइन्सच्या विमानाने भारतात परतणार आहे. लाहोरहून निघणारे दिल्लीचे विमान पकडून येणार असल्याचे मलिकने सांगितले. अफजल गुरुच्या फाशीनंतर दहशतवादी संघटनांची शिखर संघटना युनायटेड जिहादी कौन्सिलच्या मेळाव्यात मलिक हा जमात उद दवाचा म्होरक्या हाफीज सईदच्या शेजारी बसला होता. त्यामुळे मलिकचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. मलिकची बायको पाकिस्तानी आहे तिला व आपल्या मुलीस भेटण्यासाठी तो नेहमीच पाकच्या वा-या करीत असतो.

अफझल गुरूच्या मृतदेहाच्या मागणीवरून फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सने पुकारलेल्या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. श्रीनगरात जनजीवन सुरळीत सुरू होते.

युनायटेड जिहादी कौन्सिल
लष्कर ए तोयबा,हिजबुल मुजाहिदीन,अल बदर,हरकत उल अन्सार या उपद्रवी संघटनांबरोबरच इतर छोट्यामोठ्या दहशतवादी संघटनेची एकत्रित मोट बांधून युनायटेड जिहादी कौन्सिलही शिखर संघटना उभारण्यात आली आहे. या संघटनेची सूत्रे सईदच्या हाती आली आहेत.

काश्मीर विधानसभेत गोंधळ
अफझल गुरूच्या फाशीनंतर उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचा मृतदेह कुटुंबीयांना परत करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जम्मू-काश्मीर विधान परिषदेत शुक्रवारी विरोधकांनी गदारोळ केला. पीडीपीच्या सदस्यांनी सभात्याग केला.