अमान - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने हवाई दलाच्या एका पायलटला अमानुषपणे जाळून मारल्याची घटना उघडकीस आल्याच्या दुसर्या दिवशी जॉर्डनने दोन दहशतवाद्यांना फाशी दिली. फासावर चढवण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक
इराकी महिला दहशतवाद्याचाही समावेश आहे.
साजिदा अल रिशावी आणि अल कायदाचा दहशतवादी झियाद अल करबोली याला बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास मृत्युदंड देण्यात आला. दोघांनाही कोर्टाने दोषी ठरवले होते. त्याची अंमलबजावणी दक्षिणेकडील स्वाका तुरुंगात करण्यात आल्याचे सरकारचे प्रवक्ते मोहंमद अल मोमानी यांनी स्पष्ट केले. लेफ्टनंट कसाबेह यांचे समर्पण वाया जाणार नाही. आम्ही ते कदापि जाऊ देणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना यापेक्षाही मोठी शिक्षा देऊ, असे जॉर्डन सरकारने म्हटले आहे. अमानमध्ये २००५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे रिशावी या महिला अतिरेक्याचा हात होता. २००७ मध्ये तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. दुसरीकडे पायलटच्या सुटकेसाठी आयएसने १२०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी जॉर्डनने तयारी दर्शवली होती.