आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद - कारगिलमध्ये घुसखोरी करून आपल्याच देशाची जगभर नाचक्की करण्यास कारणीभूत ठरलेले पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी बुधवारी कराचीत मुक्ताफळे उधळली.
कारगिलचे युद्ध हे प्रत्येक पाकिस्तानी नागरिकासाठी गर्वाची बाब असल्याचे मुशर्रफ म्हणाले. या युद्धात भारताचा गळा पकडण्यात पाकिस्तानी फौजांना यश आले होते. ही मोहीम पाकिस्तानी लष्कराची सर्वात यशस्वी मोहीम ठरल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 9-11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेसोबत दहशतवादविरोधी लढाईत उतरल्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले. दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेची साथ देणेच पाकिस्तानच्या दृष्टीने सोयीचे होते, असे सांगून अमेरिकेसोबत मैत्री पाकिस्तानसाठी हिताची आहे, असे ते म्हणाले. माजी सरन्यायाधीश इफ्तिखार मोहंमद चौधरी यांना बडतर्फ करण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी आपल्या कार्यकाळात घेतला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात प्रचंड आंदोलन झाले होते. यावर विचारले असता तत्कालीन सरकारने कुणालाही नजरकैदेत ठेवले नव्हते, असे मुशर्रफ म्हणाले. इस्लामाबादेतील लाल मशिदीवरही मुशर्रफांनी कारवाई केली होती. अतिरेक्यांनी महिला, मुलांना ओलीस ठेवल्यामुळे ही कारवाई के ल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानात मे महिन्यात संसद व प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका होत आहेत. मुशर्रफ आपल्या ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगच्या तिकिटावर ही निवडणूक लढवणार आहेत.
आज उमेदवारी अर्ज
खैबर पख्तुनवा प्रांतातील चित्राल भागातून मुशर्रफ उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती शहजादा खालीद परवेझ यांनी दिली.चित्राल हा एपीएमएलचा बालेकिल्ला असल्याने मुशर्रफांनी तिथून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. मुशर्रफांनी सत्तेवर असताना या भागात लोवारी बोगद्यासारखी अनेक विकास कामे केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
परत पळून जाणार ?
पाच वर्षे परदेशात दडून बसल्यानंतर मुशर्रफ पाकिस्तानात परतले आहेत. निवडणुकीनंतर पुन्हा देश सोडून जाणार का, असे एका पत्रकाराने छेडले असता ते निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल, असे उत्तर त्यांनी दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.