आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बोइंग'ला शह देण्यासाठी भारत-रशियामध्ये करार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | वॉशिंग्टन - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या आठवड्यात भारत दौ-यावर येणार आहेत. त्यांच्या या दौ-यात नागरी विमान सेवेच्या संयुक्त विकास व निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण करार केला जाण्याची शक्यता आहे. या करारामुळे दोन्ही देशांदरम्यानच आर्थिक संबंधांना गती मिळेल. त्याचबरोबर जागतिक विमान उद्योग जगतात युरोप, अमेरिकेची एकाधिकारशाहीदेखील संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

पुतीन १० डिसेंबरला दोन दिवसांच्या दौ-यासाठी भारतात येणार आहेत. ११ डिसेंबर रोजी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत १५ व्या भारत - रूस शिखर बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (युरेशिया) अजय बिसारिया यांच्या माहितीनुसार पुतीन यांच्या दोन दिवसांच्या यात्रेत २० पेक्षा जास्त करार होण्याची शक्यता आहे. जे करार होण्याची अपेक्षा आहे त्यात दोन्ही देशांदरम्यान नागरी विमान सेवेच्या संयुक्त विकास योजना कराराचा समावेश आहे. दोन्ही देशांनी प्राधान्यक्रमाचे क्षेत्र म्हणून या क्षेत्राला सर्वोच्च स्थान दिले आहे. या शिवाय आर्थिक आघाडीवरही काही सहकार्य करार केले जाऊ शकतात. या क्षेत्रातील विकासासाठी एक उपगटसविस्तर योजना तयार करण्यासाठी काम करत आहे.

हवाई क्षेत्रात गुंतवणूक; रशिया इच्छुक
भारतात गेल्या दशकात विमान प्रवाशांच्या संख्येत अनेक पटींनी वाढ झाली आहे. अनेक नव्या कंपन्याही सुरू झाल्या असून चांगला व्यवसाय करत त्यांनी जम बसवला आहे. २०१२ - १३ मध्ये भारतातील विमान प्रवाशांची संख्या जवळपास १६.९ कोटी इतकी होती. २०२० पर्यंत संख्या ४० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवाई क्षेत्रात गुंतवणूक करण्यास रशिया इच्छुक आहे. रशियन कंपन्यांसाठी ही एक चांगली व्यापारी संधी असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही देश याकडे एक संधी म्हणून पाहत आहेत.

हे करार शक्य
-पुढील दहा वर्षांपर्यंत दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांचे व्हीजन डॉक्युमेंटेशन
-संरक्षण, अण्वस्त्र, ऊर्जा, सीमा शुल्क, बँकिंग, ऊर्जा या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करार.

अमेरिकेत 'ग्रीन डिझेल' भरून बोइंग विमानाचे परीक्षण उड्डाण
अमेरिकेत बोइंग कंपनीच्या एका विमानात 'ग्रीन डिझेल' भरून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. जगातील हा अशा स्वरूपाचा पहिलाच प्रयत्न होता व तो यशस्वी झाला आहे. वनस्पतीपासून निघालेले तेल, वेस्ट कुकिंग ऑइल, अ‍ॅनिमल फॅटपासून हे 'ग्रीन डिझेल' तयार करण्यात आले होते.

बोइंग कंपनीच्या इको-डेमॉन्स्ट्रेटर ७८७ विमानामध्ये हे इंधन भरण्यात आले. त्यानंतर विमानाची २ डिसेंबर रोजी चाचणी घेण्यात आली. विमानाच्या डाव्या इंजिनात १५ टक्के ग्रीन डिझेल व ८५ टक्के पेट्रोलियम जेट फ्युएल भरण्यात आले होते. बोइंगच्या कमर्शियल एअरप्लेन्सचे पर्यावरणपूरक उपक्रम विभागाचे व्यवस्थापकीय संचालक जेली फेल्गर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विमानासाठी ग्रीन डिझेलचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती आहे. असा वापर कंपनी तसेच ग्राहकांसाठीही फायदेशीर ठरू शकतो. भविष्यात ग्रीन डिझेलचे प्रमाण आणि उपयोग वाढवला जाऊ शकतो. व्यावसायिक पातळीवर विमानात या इंधनाचा वापर केला जावा यासाठी विमान उद्योगात पर्यावरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इको-डेमॉन्स्ट्रेटर उड्डाणांची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी ग्रीन डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

जमिनीवर परिवहन व्यवस्थेत त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसाच भविष्यात विमानसेवेतही केला जाऊ शकतो.