आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kerry Says Any Talks Rely On Steps By North Korea

उत्तर कोरियाने शांत राहावे, परराष्ट्र मंत्री केरींचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - उत्तर कोरियाने शांत राहावे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी रविवारी इशारा दिला आहे. त्याचबरोबर आशियातील आपल्या सर्व सहकारी देशांची सुरक्षा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. केरी सध्या उत्तर कोरियाच्या विरोधात समर्थन मिळवण्यासाठी आशियायी देशांच्या दौर्‍यावर आहेत.

दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात केरी जपानमध्ये दाखल झाले होते. उत्तर कोरियाच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांकडून अधिक महत्व दिले जाणे ही बाब अत्यंत दुर्देवी आहे, अशा शब्दांत केरी यांनी खंत व्यक्त केली. उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या जयंतीच्या काळातच केरी यांनी हा दौरा आखला आहे. उत्तर कोरियात सध्या या पार्श्वभूमीवर लष्कराची मोठ्या प्रमाणात परेड आणि इतर आयोजन केले जात आहेत. त्या देशात याला ‘सूर्य दिन ’ असे म्हटले जाते. दरम्यान, कोरियासोबत अणू मुद्द्यावर चर्चा केली जाऊ शकते, असे अमेरिका आणि जपानने म्हटले आहे. इतर देशांसोबत झालेल्या अणू व क्षेपणास्त्रसंबंधी झालेल्या कराराचा विचार करून उत्तर कोरियाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत.

अण्वस्त्र प्रसारबंदी स्वीकारा : खुर्शीद
उत्तर कोरियाने अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या नियमांचे पालन केले पाहिजे. त्यानुसार क्षेपणास्त्र चाचणी घेतली जाऊ नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेने चीनसोबत चर्चा केली होती. परंतु चीन उत्तर कोरियाला गरजेपेक्षा अधिक प्रोत्साहन देऊ लागले आहे, असे खुर्शीद म्हणाले.

आम्ही अमेरिकेसोबत : ओनोडेरा
उत्तर कोरिया प्रश्नी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी रविवारी जपानमध्ये दाखल झाले. कोरियामुळे निर्माण झालेल्या अणू तणावाच्या पार्श्वभूमीवर केरी जपानी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी येथे आले आहेत. जपानचे परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिडो यांच्याशी देखील केरी यांची चर्चा होणार आहे. दोन्ही देश आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्परांचे सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही सोबत आहोत, असे मत जपानचे संरक्षण मंत्री ओनोडेरा यांनी व्यक्त केले.

प्रस्ताव फेटाळला
कोरियातील बेटांवर वाढलेल्या तणावाला दूर करण्यासाठी दक्षिण कोरियाने मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला उत्तर कोरियाने फेटाळून लावले आहे. ही कृती म्हणजे दक्षिण कोरियाची चाल असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यात संयुक्त औद्योगिक क्षेत्रात बंद पडलेल्या लष्करी हालचाली आणि इतर मुद्द्यांवर उत्तर कोरियासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. कमेटी फॉर द पिसफूल रियुनिफिकेशन ऑफ कोरियाच्या प्रवक्त्याने सांगितले, जोपर्यंत संघर्षाचा मार्ग सोडला जात नाही तोपर्यंत ,प्योगाँगला सेऊलसोबत चर्चा करण्याची गरज वाटत नाही.

अण्वस्त्रे जमा करू देणार नाही : किशिडा
उत्तर कोरियाला अण्वस्त्रे जमा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत जपानचे परराष्ट्र मंत्री फुमिओ किशीडा यांनी इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने फेब्रुवारीमध्ये तिसर्‍यांदा अणू चाचणी केली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने कोरियावर निर्बंध टाकण्यात आल्याचे जाहीर केले होते.