आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kevin Rudd To Be Sworn In As Australian Prime Minister

लोकप्रियता घटल्याने निवडणुकीच्या तोंडावर महिला पंतप्रधानाची उचलबांगडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न - आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीची वाताहत होणार असे दिसताच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सत्ताधारी लेबर पार्टीच्या पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक केव्हिन रुड यांनी गिलार्ड यांना 12 मतांनी पराभूत केले. विशेष म्हणजे नेतृत्वबदलामुळे गिलार्ड यांची राजकीय कारकीर्दही संपुष्टात आली आहे.
लेबर कॉकशस मतदानात रुड यांना 57 तर गिलार्ड यांना 45 मते मिळाली. लेबर पार्टीचे संसद सदस्य आणि सिनेटर्सनी रुड यांच्या बाजूने भरभरून मतदान केले.तीन वर्षांपूर्वी गिलार्ड यांची बंडखोरी करून रुड यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी केली होती. बुधवारी रुड यांनी नेतृत्वबदलाच्या मोहिमेत बाजी मारून त्याचे उट्टे फेडले. गिलार्ड यांना आता गव्हर्नर जनरल क्वेंटिन ब्रायस यांच्याकडे राजीनामा सादर करावा लागणार आहे.त्यानंतर रुड यांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा होईल.
आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टी पुन्हा सत्तेवर येणार नाही असे विविध जनमत चाचण्यांचे अहवाल होते. 150 सदस्यांच्या संसदेत विरोधक कंझर्व्हेटिव्ह पार्टी सत्ता खेचून नेण्याची शक्यता आहे. रुड यांची पंतप्रधानपदी नेमणूक झाल्यास ही घसरण थोडीफार कमी होऊ शकते असाही कौल या सर्वेक्षणांमध्ये होता.

राजकीय संन्यास घेणार :गिलार्ड

पक्षांतर्गत मतदानात पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा गिलार्ड यांनी केली होती.त्यानुसार आगामी सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही असे गिलार्ड यांनी मतदानानंतर स्पष्ट केले. गिलार्ड या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. मात्र आपल्यानंतर येणाºया प्रत्येक महिलेसाठी आता पंतप्रधानपदाचा मार्ग सोपा असल्याचे त्या म्हणाल्या.
गिलार्ड यांची लोकप्रियता घटली
चांगला आर्थिक विकास,बेकारी आणि व्याज दरात घट अशा उपाययोजना करूनही गिलार्ड यांची लोकप्रियता घटली होती. त्यांच्यावर कुठे केक तर कुठे सँडविच फेकून लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. सर्वेक्षणानुसार गिलार्ड यांच्यामुळे आगामी निवडणुकीत लेबर पार्टीच्या 35 जागा घटणार होत्या.

सप्टेंबरमध्ये निवडणूक
नियोजित कार्यक्रमानुसार सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.परंतु रुड यांनी ठरवल्यास 3 ऑगस्ट रोजी निवडणूक होऊ शकते.
राजकीय परिणाम
गिलार्ड यांच्यापाठोपाठ अनेक मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री पीटर गॅरेट यांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

तिसर्‍या परीक्षेत नापास
सन 2010 मध्ये गिलार्ड यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नेतृत्वबदलाच्या परीक्षेत दोन वेळा उत्तीर्ण झाल्या होत्या. तिसºया परीक्षेत मात्र त्यांना अपयश आले.