आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान सईद तालिबानचा नवा म्होरक्या, हकिमुल्‍लाचा बदला घेणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात हकिमुल्ला मेहसूदचा खात्मा झाल्यानंतर शनिवारी पाकिस्तानी तालिबानचा नवा म्होरक्या म्हणून खान सईद मेहसूद याचे नाव जाहीर झाले. उत्तर वजिरिस्तानच्या आदिवासी भागात शुक्रवारी अमेरिकेने जोरदार कारवाई केली होती.

मेहसूद ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान शुराच्या (मंडळ) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुराचे सर्व 43 सदस्य बैठकीला उपस्थित होते. ही बैठक नेमकी कोठे झाली, याची माहिती मात्र समजू शकली नाही. बैठकीतील सर्व सदस्यांनी खान सईद मेहसूद ऊर्फ साजना याच्या बाजूने कौल देत दहशतवादी कारवायांची सूत्रे त्याच्या हाती सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘डॉन’ने हे वृत्त दिले आहे. शुराच्या बैठकीत साजनाबरोबरच उमर खालिद खुरासानी, मुल्ला फजलुल्ला, गालिब मेहसूद या इतर तिघांच्या नावावरही विचार करण्यात आला. त्यात मोहंमद तालिबानचा म्होरक्या उमर खालिद खुरासनी हा प्रबळ दावेदार मानला जातो. स्वात तालिबानचा म्होरक्या मुल्ला फझलुल्ला याचे नावदेखील बैठकीत होते. फझलुल्ला सध्या अफगाणिस्तानातील कारवायांत सक्रिय आहे. दरम्यान, तालिबानसोबतच्या शांती चर्चेनंतर काहीतरी तोडगा निघावा, यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्नशील असतानाच अमेरिकेकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. तालिबानने देशभरात सातत्याने केलेल्या दहशतवादी कारवायांत आतापर्यंत 7 हजार सुरक्षा जवान व 40 हजारांहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

कराची तळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड
खान सईद मेहसूद हा कराची येथील नौदलाच्या तळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जातो. वायव्येकडील बानू शहरात 2012 मध्ये तुरुंगफोड करण्यात आली होती. त्यात सुमारे 400 दहशतवादी साथीदारांची सुटका केली होती.

कोण आहे हा साजना ?
साजना (36) अत्यंत कट्टर दहशतवादी फळीपैकी आहे. मेहसूदने कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. धार्मिक शिक्षणही त्याने घेतलेले नाही, परंतु दहशतवादी कारवायांचा दीर्घ अनुभव त्याच्याकडे आहे. तो टोकाचा कट्टरवादी असून अफगाणिस्तानात त्याने अमेरिका आणि तेथील सरकारविरोधात कारवाया केल्या होत्या. तो दक्षिण वजिरिस्तान तालिबानचा म्होरक्या म्हणून आतापर्यंत सक्रिय होता.

सूड उगवणार
मेहसूद ठार झाला असला तरी आमचे युद्ध सुरूच राहणार आहे. आम्ही सूड उगवू, असा इशारा तालिबानच्या उत्तर वजिरिस्तानचा म्होरक्या अबू ओमरने दिला आहे. आम्ही आमचा शत्रू चांगल्या प्रकारे ओळखतो, असे ओमरने स्पष्ट केले आहे. आॅगस्ट 2009 मध्ये ड्रोन हल्ल्यात बैतुल्ला मेहसूदला ठार करण्यात आले होते. त्यानंतर हकिमुल्ला दहशतवादी संघटनेचा नवा म्होरक्या बनला होता. बैतुल्लाच्या हत्येचा सूड आठवडाभरातच घेतला होता. पाकिस्तानच्या लष्करी मुख्यालयास तालिबानने 20 तासांचा घेराव घातला होता.