आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी रेल्वेस्थानकावरील चाकूहल्ल्यात सहा जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या गंगझोऊ शहरातील गजबजलेल्या रेल्वेस्थानकात मंगळवारी चार जणांनी केलेल्या बेसुमार चाकूहल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले. यामध्ये दोन महिला व एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. दोन महिन्यांतील अशा प्रकारचा हा तिसरा हल्ला आहे. पहिले दोन हल्ले झिनजियांगमधील अतिरेक्यांनी केल्याचा आरोप आहे.
पांढरी टोपी घातलेल्या चार हल्लेखोरांनी सकाळी 11.30 वाजता स्थानकाच्या चौकात नागरिकांवर अचानक चाकूहल्ला केला. जखमींमध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. जखम जीविताला धोका पोहोचण्याइतपत नाही. हल्लेखोरांपैकी एकाला ठार करण्यात आले, अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, त्यातील एकाला अटक करण्यात यश मिळाले. पोलिसांनी एका हल्लेखोरावर गोळी झाडून जखमी केले. जखमी हल्लेखोराने पांढरी टोपी, पांढरा टी शर्ट व जीन्स घातली होती.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, हा हल्ला कोणीही आणि कुठल्याही व्यक्तीने घडवून आणला असला तरी त्याची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. चिनी लोकांची सुरक्षा आणि सामाजिक स्थैर्यासाठी कडक पावले उचलली जातील. हल्ला झालेल्या दोघांपैकी एकाच्या पाठीवर, तर दुसर्‍याच्या मानेवर वार करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीने झिंन्हुआ वृत्तसंस्थेला सांगितले.
30 ते 40 वयोगटातील हल्लेखोरावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गोळीबार केला. त्यात ते जखमी झाले. हल्लेखोराची ओळख पटली नसून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या घटनेचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला नसल्याचे गंगझोऊ रेल्वेतर्फे सांगण्यात आले. गेल्या 70 दिवसांत नागरिकांवर अशा प्रकारचे दोन चाकूहल्ले करण्यात आले. उगूरबहुल झिनजियांग प्रांतातील अतिरेक्यांचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.