आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळखोरीने कोडॅक कॅमे-याचे शटर बंद, भारतीय युनिटवर परिणाम नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - 120 वर्षांपूर्वी फोटोग्राफीची कला सर्वसामान्यांच्या ‘हातात’ पोहोचवणा-या अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने दिवाळे वाजले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वेगापुढे नतमस्तक झालेल्या कोडॅकवर गुरुवारी अमेरिकेत दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्याची पाळी आली. 1969मध्ये चंद्रावर पाऊल टाकणा-या नील आर्मस्ट्राँगने कोडॅकच्याच कॅमे-याने चंद्रावरील पहिल्या पावलांचा क्षण टिपला होता. सौम्य आणि साजिरा भासणारा चंद्र प्रत्यक्षात खरखरीत असल्याची पहिली छबी कोडॅकवरच उमटली होती.
एकेकाळी अ‍ॅपलसारखी मिजास
जॉर्ज इस्टमनने 1883मध्ये रोल असणा-या फोटो फिल्मचा शोध लावला होता. 1888मध्ये इस्टमनने आपला पहिला कॅमेरा बाजारपेठेत उतरवला होता.
1890मध्ये हातात मावणारा पहिला कॅमेरा ‘ब्राऊनी’ लाँच झाला. एक डॉलर्स किंमत असलेल्या हा ब्राऊनी कॅमेरा पुढील तीन पिढ्यांनी वापरला. आजच्या गुगल, अ‍ॅपलपेक्षा अधिक मिजास तेव्हा कोडॅकची होती.
1970मध्ये पहिल्या डिजिटल कॅमे-याचा शोध लावण्याचा दावा कंपनीने केला.
70च्या दशकात अमेरिकेत 90 टक्के फोटो फिल्म व 85 टक्के कॅमेरे कोडॅकचेच होते.
80च्या दशकात कंपनीत सुमारे 1.45 लाख कर्मचारी काम करत होते.
आताची परिस्थिती इतकी बिकट आहे की, चांगल्या खरेदीदाराचा शोध आणि 19000 कर्मचा-यांच्या पगारासाठी कंपनीला अमेरिकी बँक सिटीग्रुपकडून 95 कोटी डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागले आहे.

भारतीय युनिटवर परिणाम नाही
कंपनीनुसार तूर्त अमेरिकेतील कारखाने दिवाळखोरीत काढले जाणार आहेत. देशाबाहेरील सहयोगी कंपन्या पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. कोडॅक इंडियाचे उपाध्यक्ष
पी.एन. रघुविर यांनी कंपनीच्या निर्णयामुळे भारतीय कंपनीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.

13 कारखान्यांना टाळे, 47 हजार कर्मचारी बाहेर
2003 पासून कंपनीने आपले 13 कारखाने बंद केले आहेत. या काळात 47 हजार कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष अँटॉनियो पेरेझ म्हणाले की, चांगला खरेदीदार मिळाल्यास कंपनीचे भले होऊ शकते.
जागतिक मंदी, कर्जसंकटामुळे श्रीमंत देश देशोधडीला!
बाजारात मंदी : ९ लाख कोटी रुपये पाण्यात
वाढत्या खर्चाने ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रात मंदी