पॉपस्टार लेडी गागाने / पॉपस्टार लेडी गागाने गुलामासारखे वागवले- जेनिफर ओनील

वृत्तसंस्था

Dec 26,2011 11:36:52 PM IST

लॉस एंजिल्स - पॉप क्षेत्रातील वादळ म्हटल्या जाणा-या गायिका लेडी गागाने आपल्याला गुलामासारखी वागणूक दिली. तिच्याकडे काम करत असताना वर्षभरात चांगले वागवले गेले नाही, असा खळबळजनक आरोप गागाची माजी साहाय्यक जेनिफर ओनील यांनी केला आहे. अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा म्हणून त्यांनी गागाच्या कंपनीविरुद्ध खटलाही दाखल केला आहे.
गागाचे जगात अनेक पॉप शो होतात. त्याचे सर्व नियोजन मर्मेड टुरिंग कंपनी पाहते. गागा हिची मालक आहे. याच कंपनीत आपण नोकरी केली. तेरा महिने गागाची असिस्टंट होते. या काळात एखाद्या गुलामाला वागवावे, तसे मला वागणूक दिली गेली. या काळात अनेकवेळा गागाकडे ओव्हरटाइम करावा लागला. त्याचा मोबदला मिळावा, अशी मागणी जेनिफरने केली आहे. या संदर्भात जेनिफरने गागाविरोधात दावा ठोकला आहे. गागासाठी आपल्याला खूप कष्ट सोसावे लागले. स्टेडियम, खासगी विमान, श्रीमंती हॉटेल, बोटी, रेल्वे अशा सर्व ठिकाणी तिच्यासाठी अगदी खालच्या स्तरावरील कामेही आपणास करण्यास भाग पाडण्यात आले. तिच्या शॉवरनंतर टॉवेल उचलण्यापासून बरीच खासगी कामे गागाने गुलामाप्रमाणे करून घेतल्याचा आरोप जेनिफरने केला आहे. एवढेच नाही, तर कामावरही खूपच लवकर बोलावले जात. त्यामुळे अतिरिक्त काम करावे लागत होते. तेरा महिने हा छळ सोसावा लागला.
या काळात 7 हजार 168 तास अतिरिक्त काम करावे लागले होते. या कामाचा आर्थिक मोबदला देण्याची मागणी जेनिफर यांनी गागाकडे केली. हा मोबदला दोन कोटी एक लाख रुपयाहून अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

X
COMMENT