आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lady Killed Due To Obama Stand, Islamic State Group Action

ओबामा ठाम राहिल्याने ओलीस तरुणीची हत्या, इस्लामिक स्टेटच्या गटाचे कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सिरियात दोन वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या तरुणीच्या मृत्यूला बुधवारी अमेरिकेने दुजोरा दिला. ही तरुणी आरोग्य क्षेत्रात कार्यरत होती. तरुणीच्या बदल्यात खंडणी देण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली होती. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र त्यास नकार दिला होता. तरुणीच्या मृत्यूनंतरही ओबामा सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यावरून सरकारवर टीका होत आहे.

हत्या झालेल्या तरुणीचे नाव कायला मुलर आहे. ती २६ वर्षांची होती. अलेप्पो येथे ऑगस्ट २०१३ मध्ये तिचे अपहरण करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात तिच्या मृत्यूचा दावा इस्लामिक स्टेटच्या एका गटाकडून करण्यात आला होता. सिरियातील राका शहरात जॉर्डन हवाई दलाच्या कारवाईत कायलाचा मृत्यू झाला, असा दावा दहशतवाद्यांनी केला आहे; परंतु तिची हत्या झाल्याच्या घटनेला अमेरिकेकडून दुजोरा मिळू शकला नव्हता. आता मात्र ओबामा यांनी दुजोरा मिळाल्यानंतर मी शोकाकुल झालो आहे, ही बातमी तिच्या कुटुंबीयांना कळवणे माझ्यासाठी कठीण बनले आहे, अशी तत्काळ प्रतिक्रिया दिली. दरम्यान, कायलाची सुटका करण्याची मागणी वाढल्यानंतर ओबामा यांनी अमेरिकेच्या बळाची शेखी मिरवली होती. अमेरिका सिरिया किंवा जगातील कोणत्याही भागात ओलीस ठेवलेल्या आपल्या नागरिकांची अन्य मार्गांनीदेखील सुटका करून घेऊ शकते. मोहीमदेखील राबवण्यात आली होती. त्यात यश आले नाही.

व्हाइट हाऊसवर दबाव वाढला
अपहरण किंवा दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी सरकारने आपल्या धोरणाचा फेरविचार केला पाहिजे. यावरून व्हाइट हाऊसवर दबाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही युरोपियन देशांनी आपल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी खंडणीची रक्कम देऊन त्यांना सुखरूप मायदेशी आणल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे.

बदल अशक्य
सिरियातील घटनेनंतरही सरकार भूमिकेवर ठाम आहे. त्यात बदल होऊ शकत नाही. तसे केल्यास दहशतवादी निष्पाप नागरिकांचे अपहरण करून सर्रास खंडणी वसूल करू लागतील, अशी भीती ओबामा यांनी व्यक्त केली.

येमेनमधील राजदूत कार्यालये बंद
हिंसाचार आणि अशांततेमुळे अमेरिका-ब्रिटनने येमेनमधील आपली राजदूत कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी अधिका-यांनी कार्यालय सोडल्याची माहिती ब्रिटनचे मध्यपूर्व संबंधांचे मंत्री टॉबियास इलवूड यांनी दिली. त्याअगोदर अमेरिकेने आपले कर्मचारी कार्यालयातून मायदेशी बोलावले. गेल्या अनेक दिवसांपासून येमेनमध्ये बंडखोरांनी हिंसाचार सुरू ठेवला आहे. इराणची फूस असलेल्या बंडखोर हौथी गटाने राजधानीवर अनेक वेळा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यात चकमक उडाली होती.