आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lashkar e taiyyaba Is Biggest Threat To South Asia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचा इशारा: द. आशियाला तोयबाचा धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- लष्कर- ए- तोएबामुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला सर्वात मोठा धोका असून मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या या दहशतवादी संघटनेला पायबंद घालण्यासाठी कडक पावले उचला असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या एका उच्चपदस्थ अधिका-याने म्हटले आहे.
लष्कर- ए- तोएबाचे सामर्थ्य आणि कारवायांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. हा आमच्यादृष्टिने काळजीचा विषय आहे. लष्कर- ए- तोएबामुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला असलेल्या धोक्याबाबत मी अनेकदा इशारा दिलेला आहे, असे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे समन्वयक डॅनियल बेंजामीन यांनी पत्रकारांना सांगितले. तोएबाविरूद्ध कडक कारवाई करण्याचे आवाहन आम्ही पाकिस्तानला अनेकदा केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय दहशतवादाचा धोका कमी होणार नाही, असे बेंजामीन यांनी दहशतवाद-2011 हा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर म्हटले आहे.
काय सांगतो अहवाल?
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची प्रक्रिया लष्कर- ए- तोएबामुळेच थांबली आहे. काश्मीरात घडवून आणण्यात येत असलेला हिंसाचार आणि पाकिस्तानी भूमीतून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात सातत्याने होणारी घुसखोरी हे भारत सरकारच्या दृष्टीने चिंतेचे विषय आहेत. भारताने पाकिस्तानबरोबर सुरू केलेल्या व्यापारविषयक बोलणीमुळे दोन देशातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झालेली होती मात्र एकपाठोपाठ हल्ले करून तोएबा उभय देशातील संबंध आणखी बिघडवत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
इराणवर आणखी कठोर निर्बंध
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणवर आणखी कडक निर्बंध लादले आहेत. यावेळी इराणचे ऊर्जा आणि पेट्रोलियम क्षेत्र डोळ्यासमोर ठेऊन निर्बंधांचा पाश आवळण्यात आला आहे. अण्वस्त्र कार्यक्रमाबाबात आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे पालन न केल्यामुळे इराण सरकारला एकटे पाडणे हा निर्बंधांचा हेतू असल्याचे ओबामा यांनी म्हटले आहे. यापूर्वी लादलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून इराणी तेलाच्या खरेदीची देयके स्वीकारण्याची यंत्रणा इराणला स्थापित करता येऊ नये, हा या निर्बंधांचा उद्देश आहे. नव्या निर्बंधात इराणकडून तेल खरेदी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकी बँकेकडून डॉलर किंवा मौल्यवान धातू खरेदी करण्यास सहकार्य करण्यास संस्था किंवा व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे. ओबामांनी इराणी बँकांशी सर्व प्रकारचे व्यवहार निषिद्ध ठरवले आहेत. इराण बँकेच्या वतीने कोट्यवधी डॉलरचा व्यवहार करणाºया चीनमधील बँक ऑफ कुनलान आणि इराकमधील इलाफ इस्लामिक बँकेवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.

10000 दहशतवादी हल्ले
2011मध्ये जगातील 70 देशांमध्ये 10,000 हून अधिक दहशतवादी हल्ले झाले असून या हल्ल्यांमध्ये 12,500हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मात्र 2010 च्या तुलनेत हल्ल्यांमध्ये 12 टक्के घट झाली असल्याचे अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या दहशतवाद-2011 या अहवालात म्हटले आहे. जगात झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी 75 टक्के हल्ले दक्षिण आशिया आणि नजीकच्या पूर्व आशियामध्ये झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक हल्ले अफगाणीस्तान, पाकिस्तान आणि इराकमध्ये झाले आहेत. 2011मध्ये आफ्रिकेत 978 दहशतवादी हल्ले झाले. युरोप आणि युरोशियातील दहशतवादी हल्ल्याच्या प्रमाणात 20 टक्के घट झाली. तुर्कस्तानमध्ये मात्र हल्ले वाढले आहेत. 2010मध्ये तुर्कीमध्ये 40 दहशतवादी हल्ले झाले होते. 2011 मध्ये तेथे 91 हल्ले झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.