आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षी, मुलांची शिकण्याची पद्धत एकसारखीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन-पक्षी व नवजात अर्भकांची भाषा, बोलायला शिकण्याची पद्धत सारखीच असल्याचे नव्या संशोधनात आढळून आले आहे. दोघेही टप्प्याटप्प्याने भाषा अवगत करतात. जपान, इस्रायल आणि अमेरिकी शास्त्रज्ञांच्या संयुक्त पथकाने साँगबर्ड्सवर केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे.

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात साँगबर्ड्सला नवीन धून शिकवताना मिळालेल्या प्रतिसादाच्या नोंदी केल्या. या नोंदीची तुलना नवजात अर्भकाच्या आवाजाशी करण्यात आली. विविध आवाजांतूनच पुढे अर्भकाला भाषा, बोलणे शिकण्याची कला अवगत होते. शास्त्रज्ञांनी पक्षी व अर्भकावर केलेल्या संशोधनात याच बाबीवर मुख्य भर दिला. या प्रक्रियेतून पक्ष्यांचा आवाज व त्यांची भावना समजण्याची सोपी पद्धती विकसित होण्यास मदत मिळाली आहे. संशोधकांनी त्यासाठी झेब्रा फिन्चेस पक्ष्यावर संशोधन केल्याचे पीएचवायएस वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे.

भोवतालच्या पक्ष्यांनी उच्चारलेला शब्द, ध्वनीसारखा आवाज उच्चारण्यासाठी फिन्चेससारखे साँगबर्ड्स कशा पद्धतीने शिकतात याची उकल या संशोधनातून होईल. नंतर संपूर्ण गाणे शिकण्याची प्रक्रिया पार पडते. पक्षी गाणे शिकण्यासाठी खूप कष्ट घेतात. अर्भकाने काढलेल्या आवाजाचा डाटाबेस तयार करण्यात आला होता. पक्षी गाणे शिकण्यासाठी जी पद्धती वापरतात तेच तंत्र अर्भक भाषा शिकण्यासाठी वापरत असल्याचे यातून स्पष्ट झाले. मनुष्यामध्ये भाषा विकसित होण्याच्या तंत्राची उकल या माध्यमातून होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.


फिन्चेस पक्ष्यांवर प्रयोग
निष्कर्षावर पोहोचण्याआधी शास्त्रज्ञांनी कमी वयाच्या तीन फिन्चेस पक्ष्यांना वेगळे करून प्रयोगशाळेत गाणे शिकवले. पूर्वतयारीमुळे पक्ष्यांना धूनचा उच्चर करताना अडचण जाणवली नाही. त्यानंतर शास्त्रज्ञांनी साउंड ए व साउंड बी असे वेगवेगळे गाणे ऐकवले. अशा पद्धतीने एकत्रित बीसी धून ऐकवण्यात आली. यानंतर त्यांना एबीसी व सीबीए या क्रमाने गाणे शिकवण्यात आले. गाण्याचा तुकडा पाडून पक्षी नवे गाणे शिकतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे साँगबर्ड्सने गाणे शिकणे ही सहज प्रक्रिया नसल्याचे स्पष्ट झाले.